Yashomati Thakur: 'वर्ल्ड प्रेस फ्रिडम डे' ला यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांची केली मुस्कटदाबी; 'बंद करा कॅमेरा' म्हणत हिसकावला कॅमेरा, अन अकोला बद्दल बोलल्या अपशब्द … काय घडलं नेमकं वाचा...






भारतीय अलंकार 24

अकोला : महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांचा आज विविध विषयासाठी जिल्हा दौरा आयोजित होता. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकी नंतर पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेला ठाकूर उशिरा आल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी  पत्रकारांसोबत दादागिरी केल्याचा आरोप उपस्थित पत्रकारांनी केला. 




जिल्हाधिकारी कार्यालयात हा प्रकार घडला. पत्रकार परिषदेला बोलावल्यावर वेळेवर न येवूनही ठाकूर यांनी पत्रकारांसोबत अरेरावीची भाषा वापरली. यावेळी चित्रीकरण करणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीचा कॅमेरा ही त्यांनी हिसकावला. सोबतच अकोल्याबद्दल अनुद्गार काढले. या घटनेचा अकोला   जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनेने निषेध नोंदवीला आहे.



काय घडलं नेमकं


बंद करा कॅमेरा असे म्हणत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी एका वृत्तवाहिनीचे वार्ताहर  यांचा कॅमेरा हिसकावत आज दादागिरी केली असल्याचा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे. पत्रकार परिषदेला उशीरा आलेल्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद आयोजित केल्याची माहिती देखील नव्हती. असा कांगावा त्यांनी केला. दरम्यान, अकोला येथील सर्व पत्रकारांनी मंत्र्यांच्या दादागिरी व कॅमेरा हिसकावण्याचा कृतीचा निषेध करीत पत्रकार परिषद उधळून लावली.



दरम्यान, "अकोला बदनाम आहे. अकोल्यात अधिकारी येत नाही" असे अकोला जिल्ह्याबद्दल श्रीमती ठाकूर यांनी अपशब्द वापरले. 




जिल्हा माहिती अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज दुपारी 12.30 वाजता महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार सर्व पत्रकार उपस्थित झाले. तत्पुर्वी तिथे अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी विविध विभागांची बैठक घेतली. या बैठकीपासून देखील  पत्रकारांना दूर ठेवण्यात आले होते. मंत्र्यांनी बैठकीत पत्रकारांना दूर का ठेवले असा प्रश्न यावेळी पत्रकारांना पडला होता. त्यात साडेबाराची पत्रकार परिषद 1.15 वाजेपर्यंत सुरु न झाल्याने पत्रकारांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा एकजुटीने निर्णय घेतला. यानुसार पत्रकारांनी तेथून निघून जात असतानाच तेवढ्यात ऍड ठाकूर या बाहेर येत त्यांनी पत्रकारांशी संवाद सुरु केला. याप्रसंगी त्यांच्या सर्व संवादाचे चित्रीकरण एक वार्ताहर करीत होते.

 

 

 

यावेळी अ‍ॅड.ठाकूर एकदम चिडून जाऊन त्यांनी 'बंद करा कॅमेरा', असे म्हणत कॅमेरा हिसकावला. त्यानंतर सर्वच पत्रकारांनी त्यांच्या या कृतीचा निषेध केला. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी सावरासावर  करण्याचा प्रयत्न केला. 




आज जागतिक प्रेस फ्रिडम डे असताना पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर एखाद्या मंत्र्यांनी दादागिरी करत कॅमेरा बंद करण्याचा आदेश देणे, तो हिसकावण्याची कृती करण्याचा निषेध सर्वत्र पत्रकार संघटनांनी केला. सर्व पत्रकारांनी एकमताने राज्याच्या महिला व बाल विकास मंत्र्यांची पत्रकार परिषद उधळून लावली. कुणीच पत्रकार परिषदेला थांबले नाही. अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांना चित्रीकरणाचा इतका का राग आला. मंत्र्यांच्या परवानगीनंतरच जिल्हा माहिती कार्यालय पत्रकार परिषदेचा वेळ निश्चित करत असतात, मग ठाकूर यांना पत्रकार परिषदेविषयी माहिती का नसावी, पत्रकार परिषदेची वेळ न पाळणे, उशीर झाल्यावर मंत्र्यांची पत्रकारांवर दादागिरी का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान,अकोल्यातील सर्व पत्रकार संघटनांनी यशोमती ठाकूर यांच्या कृतीचा निषेध नोंदवला आहे.


टिप्पण्या