Sameer Aaychit death case: समीर आयचीत मृत्यू प्रकरणी डॉक्टर पीयूष भिसे वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा; शैलेश अलोणे यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

    मृतक पंडित समीर आयचीत महाराज





अकोला: जयहिंद चौक येथील भिसे हॉस्पिटलचे डॉक्टर पीयूष भिसे यांच्या दुर्लक्षामुळे  पंडित समीर अयाचित महाराज यांचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यउपाध्यक्ष शैलेश अलोणे यांनी केला आहे. यासंदर्भात अलोणे यांनी पोलीस अधीक्षक व संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले आहे.




जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनात अलोणे यांनी म्हटले की, आमचे संघटनेचे पदाधिकारी तथा साप्ताहिक स्वराज्य गर्जनाचे उपसंपादक पंडित अयाचित महाराज यांना ताप व खोकल्याचा आजार असल्याने ते डॉ. पियुष भिसे यांच्या भिसे हॉस्पीटल जुने शहर या ठिकाणी १२ मे २०२१ रोजी उपचारासाठी भरती झाले होते. तेव्हा डॉ. भिसे यांनी त्यांना कोरोना झाल्याचे निदान करून उपचार सुरू केला होता.




मात्र, दोन दिवसांनंतर डॉ. भिसे हे बाहेरगावी निघून गेले. त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांवर संपूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी सोपवली. सबब त्यांनी योग्य उपचार केला नाही. रुग्णाला त्याचे नातेवाईक व पत्नीला देखील भेटू दिले नाही. काय उपचार चालू आहेत, याची माहिती सुद्धा दिली नाही. तसेच भिसे यांच्या हॉस्पीटल मध्ये ऑक्सिजन वा व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही.




रुग्णाला सहा रेमडेसीविर इंजेक्शन दिले, हलगर्जी व योग्य उपचारा अभावी रुग्णाची तब्येत जास्त खराब झाल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात यावे, असे सांगण्यात आले. त्यानुसार १८ मे रोजी रुग्णाला रुग्णवाहिकेत पाठविण्यात आले. परंतू रुग्णालयात पोहचण्याआधीच समीर अयाचित हे मृत पावले असल्याचे निदान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले.  या सर्व प्रकरणात डॉ. पियुष भिसे हेच पूर्णपणे जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शैलेश अलोणे यांनी केली आहे. अलोणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिले आहे. डॉ. भिसे हॉस्पिटलमध्ये रुग्णाबाबत हलगर्जीच्या तक्रारी याआधी देखील चर्चिल्या गेल्या आहेत. अकोला महापालिकाने  कारवाई देखील केली असल्याचे समजते. आता या प्रकरणी अकोला पोलीस  काय कारवाई करतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.




टिप्पण्या