Remdesivir shortage:high court: अकोला, नागपूर, भंडारासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचा अनुशेष भरून काढा- उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आदेश






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांसाठी उपचारासाठी प्रभावी समजल्या जाणारी रेमडीसीविरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा तुटवडा भासत असून  याची काळाबाजारी सुरू आहे.अकोल्यात ही हे चित्र आहे, काही दिवसांपूर्वी या तुटवडाचा फायदा घेत १३ जणांनी रेमडीसीविर इंजेक्शनची काळाबाजारी केल्याचे उघड झाले. मात्र आता हे सर्व थांबण्याची चिन्ह दिसत आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने   अकोला, नागपूर आणि भंडारासाठी रेमडीसीविर इंजेक्शनचा अनुशेष भरून काढावा, असा  आदेश राज्यसरकारला दिला आहे.  हा अंतरिम आदेश न्यायालयाने 30 एप्रिल रोजी पारित केला आहे.




रेमडेसिवीर इंजेक्शनच्या अभावी कोरोना बाधितांचा मृत्यू होत असल्याची ओरड होत आहे. राज्य सरकार द्वारे या इंजेक्शनचा वाटप करताना दुजाभाव केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना त्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठा तोडका होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवट पासून ही संख्या झपाट्याने वाढली आहे. अकोला जिल्ह्याला मुबलक रेमडेसिविरचे पुरवठा होत नसल्याची एक जनहित याचिका एडव्होकेट उमेश पैठणकर यांनी नागपूर उच्च न्यायालयात दाखल केली होती. 



सध्याची परिस्थिती पाहून  1 मे च्या संध्याकाळ पर्यंत राज्य सरकारने अकोला , नागपूर, भंडारा या तिन्ही जिल्ह्याचा रेमडेसिविरचे अनुशेष भरून काढावा, असे या आदेशात म्हंटले असल्याचे,ऍड पैठणकर यांनी सांगितले. 




अकोल्यात सुमारे ९०० इंजेक्शनची आवश्यकता आहे त्या तुलनेत केवळ ५०० इंजेक्शनचा पुरवठा केला जात होता. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता आज सायंकाळीपर्यंत नागपूरला  १५०००, अकोला जिल्ह्याला ३००० ,भंडारा जिल्ह्याला २००० रेमडीसीविर इंजेक्शनचा साठा मिळणार आहे. मिळालेल्या साठ्याचे नियोजन करून पुरवठा करण्याची जवाबदारी न्यायालयाने जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवली आहे. तर पुढील काळात राज्यसरकारने नोडल अधिकारी नियुक्त करून राज्यातील जिल्ह्यांची रुग्णांची संख्या पाहून वाटप करण्याचेही आदेश दिले आहेत, अशी माहिती एड.चेतन लोहिया यांनी दिली आहे.




न्यायालयात याचिकाकर्ते ऍड पैठणकर यांच्या वतीने ऍड संग्राम शिरपूरकर व ऍड रेणुका शिरपूरकर (नागपूर ) यांनी काम पाहिले. त्यांना ऍड चेतन लोहिया (अकोला) यांनी सहकार्य केले. या जनहित याचिकेमुळे काळाबाजार आणि चढ्या भावाने विक्रीला आळा बसेल एवढे मात्र निश्चित.

टिप्पण्या