lockdown:Akola:लॉकडाऊनच्या एक महिन्यात शहर वाहतूक शाखेची जम्बो कारवाई;15 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई, 600 वाहने जप्त




अकोला: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 15 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन जारी केला आहे. त्यानुसार अकोला जिल्हाधिकारी यांनी अकोला शहर व जिल्ह्यात काही मार्गदर्शक तत्वे जारी करून कडक लॉकडाऊन लागू केला.लॉक डाऊन व संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सर्व पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखेला दिले. निर्देश प्राप्त होताच पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी लॉकडाऊन मध्ये विनाकारण फिरणारे व जवळ वैध कागदपत्रे न बाळगणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली.  विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांची वाहने सरळ जप्त करून त्यांचे विरुद्ध अकोला शहरातील विविध पोलीस स्टेशन मध्ये दखल पात्र गुन्हे दाखल केले. 15 एप्रिल ते 15 मे या एक महिन्याचे कालावधी मध्ये शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई करून एकूण 14,753 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे कडून 8,15,400 रुपयांचा दंड वसूल केला. 




संचारबंदी आदेशाचे उल्लंघन  करून कोणतेही सबळ कारण नसताना फिरताना आढळून आलेल्या एकूण 586 वाहन चालकांची वाहने जप्त करून त्यांची वाहने शहरातील विविध पोलीस स्टेशन मध्ये लावून त्यांचे विरुद्ध दखल पात्र गुन्हे दाखल केले. लॉकडाऊन संपे पर्यंत त्यांची वाहने सोडण्यात येणार नाहीत.



ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशा प्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ व वाहतूक पोलिसांनी केली.





जिल्हाप्रशासनाने जारी केलेल्या निर्देशाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध धडक कारवाई सुरूच राहणार असल्याने नागरिकांनी विनाकारण फिरणे टाळावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.

टिप्पण्या