Crime news: तेरावे लग्न करताना कथित नववधू सोनू शिंदे अडकली पोलिसांच्या जाळ्यात; विदर्भ, मराठवाडा नंतर खान्देशात टोळीचे कारनामे






नंदुरबार: मराठवाडा, खान्देश, विदर्भात विवाहाच्या नावाखाली विवाह इच्छुकांना फसविणारी सोनू शिंदे टोळीची  मुख्य सूत्रधार सोनू शिंदे हिला अटक करण्यास  पोलिसांना यश आले आहे. खान्देशात एका सोनू शिंदे नावाच्या तरुणीला शनिवारी  अटक झाली अन एक नाही तर तब्बल तेरा कारनामे उघडकीस आले. या साधी सरळ सोज्वळ दिसत असलेल्या सोनूने तब्बल 13 मुलांना फसवले. एवढंच नव्हेतर तेराही जणांशी लग्न केले. त्यानंतर त्यांची संपत्ती लुटून पळून गेली. सोनू ही एकटीचं नाही तर तिच्या सोबत एक मोठी टोळीच असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.




अशी घडली घटना



पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू शिंदे या टोळीने हिंगोली आणि अकोला येथील लोकांना फसविले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांसोबत लग्न जुळवण्यासाठी ही टोळी विविध शहरांमधील लग्न जुळणाऱ्या मध्यस्थीची मदत घ्यायचे. यावेळी या टोळीने नंदुरबार येथे एका कुटुंबाला फसविले. या गुन्ह्यात मुख्य आरोपी सोनू हिला या कामात औरंगाबाद येथील एका दलालाने मदत केल्याचे उघड झाले आहे.




सोनू शिंदे नामक या तरुणीने दोन आठवड्यांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाने येथील एका तरुणाशी लग्न केले होते. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे पीडित नवरदेव देखील आनंदात होता. लग्नासाठी वधू पक्षाकडून काही लाखांची मागणी झाली होती. वर पक्षाने कुटुंबीयांनी वधू पक्षाला पैसे देखील दिले. मात्र, लग्नानंतर सर्व आनंदावर विरजण पडले. नवी नवरी काही दिवसातच  घरातून पळून गेली.




नववधू अचानक घरातून पळून गेल्यानंतर पीडित कुटुंबाला मोठा धक्का बसला. आपली फसवणूक झाली असल्याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून आरोपी नवरी विरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी संबंधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.




दरम्यान, तपास सुरु असतानाच पोलिसांना  सोनू शिंदे आता शिंदखेडा तालुक्यातील एका तरुणाशी तेरावे (13) लग्न करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. मात्र, पोलीस आपला तपास करत असल्याचा सुगावा या टोळीला लागला अन त्यांनी  लग्नाचे स्थळ बदलले. यानंतर अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात लग्न करण्याचे ठरवण्यात आले.




टोळीच्या मागावर असलेल्या पोलिसांनी ऐनवेळी म्हणजेच लग्न विधी सुरू असताना अंतिम क्षणी मंडपात दाखल होवून, विवाह रोखण्यात यश मिळविले.   लग्न मंडपातून सोनू शिंदे व तिच्या टोळीला जेरबंद केले. तत्पूर्वी, पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच टोळीतील नवरीची आई आणि भाऊ घटनास्थळहून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत. परंतु तथा कथित नववधू सोनू पकडली गेली आहे. 



पोलिसांच्या दक्षतेमुळे प्रकरण उघडकीस आले आहे. या कारवाईला थोडा जरी अवधी लागला असता तर आणखी एक कुटुंब सोनू शिंदे टोळीच्या जाळ्यात अडकले असते. या टोळीने खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अनेकांकडून लग्न लावून पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. तत्पूर्वी, या टोळीने हिंगोली, अकोला  येथील    युवकांची फसवणूक केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले. आपल्या पाल्यांचे विवाह जुळवताना पालकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी खातरजमा करून व किमान प्राथमिक चौकशी करून विवाह जुळवावा. अनोळखी लोकांशी विवाह करू नये,असे आवाहन यानिमित्त पोलीस विभागाने केले आहे.



टिप्पण्या