Crime news: ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर सुशील कुमार हत्या प्रकरणात फरार

     

                                      File photo



नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी आज सोमवार १० मे  रोजी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी सुशील कुमार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.




पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील छत्रसाल स्टेडियमवर पैलवानांच्या दोन गटांत मंगळवारी हाणामारी झाली होती. यामध्ये पाच पैलवानांना गंभीर दुखापत झाली होती.त्यापैकी सागर नावाच्या २३ वर्षीय पैलवानाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सुशील कुमारसह पाच जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 





सुशील कुमार सह २० अन्य आरोपींचाही पोलिसांना शोध आहे. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर पैलवानांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत २३ वर्षीय सागर राणाचा मृत्यू झाला होता. मॉडेल टाऊन परिसरातील फ्लॅट रिकामा करण्यावरुन पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. सागर राणा हत्या प्रकरणात सुशील कुमारचेही नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्ली एनसीआर सोबतच शेजारी राज्यांमध्येही छापेमारी करुन सुशील कुमारचा शोध घेतला जात आहे.





मृत पैलवान सागर राणा हा आपल्या मित्रांसोबत छत्रसाल स्टेडियमजवळील मॉडेल टाऊन परिसरातील एका घरात राहत होता. ही जागा रिकामी करण्यावरुन गेल्या मंगळवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये बेदम हाणामारी आणि गोळीबारही झाल्याचा आरोप आहे.यावेळी सुशीलकुमार उपस्थित असल्याचा दावा पीडितांनी केला आहे.

टिप्पण्या