Amravati University: winter 2020: विद्यापीठाच्या हिवाळी 2020 परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी;डॉ. सिकची यांचा विद्यापीठास प्रस्ताव





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: हिवाळी 2020 सत्र 1,3,5 पदवी आणि सत्र 1,3 पदव्यूत्तर परीक्षा पूर्णतः रद्द करावी आणि विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी, या मागणीचा प्रस्ताव विद्या परिषदेचे सदस्य डॉ. आर. डी. सिकची यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे कुलगुरू तथा विद्या परिषद अध्यक्ष डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडे पाठवला आहे.





येत्या १२ मे पासून कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेचे हिवाळी 2020  परीक्षा होणार होती. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असल्या तरी covid-19 च्या कारणामुळे त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मात्र, covid-19 कधी आटोक्यात येईल किंवा तो आटोक्यात आला तरी त्याचा धोका कमी होईल किंवा नाही, याची आज कुणालाही कल्पना नाही. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्यास ग्रामीण व डोंगराळ भागातील अपुऱ्या सोयी आणि सुविधांचा विचार करता अशा ऑनलाइन परीक्षा यशस्वी होऊच शकणार नाही,असे मत डॉ. सिकची यांनी व्यक्त केले.





डिसेंबर-जानेवारी 2020 मध्ये या परीक्षा व्हायला पाहिजे होत्या. परंतू, ही परीक्षा अद्यापही आयोजित करणे विद्यापीठाला अशक्य झाले आहे. यामुळे विद्यार्थी व शिक्षक वर्गात उदासीनता आली आहे. काही विद्यार्थी मानसिक दृष्ट्या खचत आहेत. बरेच विद्यार्थी कोरोनाग्रस्त सुद्धा असू शकतात. याबाबींचा विचार करून विद्यापीठाने त्वरित निर्णय घेवून हिवाळी 2020 च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वर्गोंनत करावे, अशी मागणी डॉ. सिकची यांनी केली आहे.




यासोबतच शेवटचे वर्ष अंतिम सत्राच्या उन्हाळी 2021 परीक्षांची तयारी सुरू करावी. फक्त अंतिम सत्र शेवटचे वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावयाची असल्यास परीक्षार्थींची संख्या एकदम कमी होईल. त्यामुळे या कमी संख्येतील परीक्षार्थींसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्यास, या परीक्षा यशस्वी होऊ शकतील,असे डॉ. सिकची यांनी सुचविले आहे.





संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आपण पालक समजून, तसेच सकारात्मक निर्णय घेऊन, सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलासा द्यावा, असे देखील डॉ.  सिकची यांनी प्रस्तवाच्या शेवटी नमूद केले आहे. या प्रस्तावावर अमरावती विद्यापीठ  काय निर्णय घेते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या