World health day: मौखिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याचा आरसा; तोंडाची योग्य निगा कशी राखावी सांगताहेत मुखरोग तज्ञ राजेश रांदड

                                      संग्रहित चित्र


- आज जागतिक आरोग्य दिन



Oral health is a mirror of physical health;  Proper oral care is essential



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: शरीरात निर्माण होणा-या शंभरावर रोगांपैकी निम्म्या रोगांचे मूळ तोंडातच असल्याने प्रत्येकाने आपल्या तोंडाची योग्य निगा राखणे आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला विदर्भातील प्रख्यात मुख कर्करोग तज्ज्ञ डॉ. राजेश रांदड यांनी आज, बुधवारी सर्वत्र साजरा होत असलेल्या जागतिक आरोग्य दिनाला  दिला.



प्रत्येकासाठी सुंदर आणि आरोग्यदायी जगाची निर्मिती करणे


             डॉ. राजेश रांदड (संग्रहित चित्र)


यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने या दिनाच्या निमित्ताने '' प्रत्येकासाठी सुंदर आणि आरोग्यदायी जगाची निर्मिती करणे'' हे घोषवाक्य दिले आहे. त्यानुषंगाने डॉ. रांदड म्हणाले, की बदलत्या जीवनशैलीमुळे आता प्रत्येकालाच आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीत सांगितलेल्या गोष्टींची अनन्य साधारण महत्व आहे. मौखिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याचा आरसा आहे, अशी म्हण आपल्या संस्कृतीत प्रचलीत आहे. वैद्यकीय क्षेत्र आता अतिशय पुढारलेले असताना ही म्हण आजही तंतोतंत खरी ठरते. आयुर्वेदिक शास्त्राचा विचार केला तर शंभरापैकी निम्म्या रोगांचे मूळ हे तोंडापासून सुरु होऊन पोटात संपते, दुर्दैवाने आपल्या देशात मात्र मौखिक आरोग्य हे केव्हाही आणि कोठेही विशेष गंभीरतेने घेतले गेले नसल्याचेच विदारक चित्र आहे. यासाठी केवळ व्यक्तीच दोषी नसून, काही गैरवाजवी प्रचलीत संस्कृती, चुकीचे राजकीय धोरण, गरीबी आणि अशिक्षितपणा या बाबी कारणीभूत आहेत. म्हणूनच हा स्वच्छ, सुंदर तोंडाचा आरसा भारतासारख्या प्रगतीशील देशात अस्वच्छतेचा बळी ठरत आहे. 



अशी घ्या काळजी


                                     संग्रहित चित्र


देशात दोन व्यक्तींपैकी एक जण मुख कर्करोगाने ग्रस्त झालेला आहे. निसर्गाने दिलेल्या या शारीरिक आरोग्याच्या प्रवेशद्वाराची योग्य प्रकारे निगा राखली तर निर्विवादपणे शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यास भरीव मदत होते. संतुलित आणि योग्य आहार, व्यसनापासून दूर राहणे, दिवसाकाठी दोन वेळा ब्रश करणे आणि तोंडाच्या आतील भागांचे निरीक्षण करुन त्यांच्या खुशालीसाठी काळजी घेणे या बाबीवर भर दिल्यास आरोग्य उत्तमच राहणार यात तिळमात्र शंका नाही. दुर्धर मुख कर्करोगाचे निदान करणारा दंतरोगतज्ज्ञ हाच पहिला महत्त्वाचा व्यक्ती ठरतो, त्यामुळे या आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास सर्वप्रथम दंतरोग तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे त्रास नसेल तरीही वर्षातून किमान दोनवेळा मौखिक आरोग्याची तपासणी करणे उचित ठरते. हा कालावधी गुटखा, तंबाखू, पान खाणाऱ्यांसाठी कमी असावा, त्यांनी वेळोवेळी ही तपासणी करुन घेण्याची नितांत गरज आहे, असेही ते म्हणाले.


टिप्पण्या