Remdesivir: court news: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात रॅकेट सक्रिय: रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच आरोपींना पोलिस कोठडी




भारतीय अलंकार 24

अकोला:  कोविड-19 या आजारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हिंगमिरे यांनी 29 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी अकोला एलसीबीच्या पथकाने छापा मारी करून रेडमीसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली होती.



या प्रकरणाची माहिती अशी की, कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगावर उपयोगी येणारे रेडमीसिव्हर इंजेक्शनचा सध्या सर्वत्र तुटवडा आहे. उपचाराअभावी नागरिक मरत आहेत. असे असताना अकोल्यातील रामनगर भागात या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती.  पोलिसांनी गुप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर आशिष समाधान मते नामक तरुण सदरचे इंजेक्शन बिना कागदपत्राचे, बिना बिलाचे तसे डॉक्टर  प्रिस्क्रिप्शन शिवाय विकत असल्याचे कळले. चार हजार रुपयाचे हे इंजेक्शन 25000 रुपये प्रति इंजेक्शन विकताना हा आरोपी रंगेहात पकडला गेला. 



या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणांमध्ये राहुल गजानन बंड (26) भारती प्लॉट जुने शहर, सचिन हिंमत दामोदर (30) अशोक नगर अकोट फाइल, प्रतिक सुरेश शहा (29) रामनगर अकोला, अजय राजेश आगरकर (25) बाळापूर नाका जुने शहर या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. तीन आरोपी औषधी दुकानात कामावर असून दामोदर हा ओझोन मध्ये तर आगरकर हा देशमुख मल्टी स्पेशालिस्ट येथे काम करतात.  या  आरोपीकडून पोलिसांनी 1 लाख 67 हजाराचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये 3 रेडमी सिव्हर इंजेक्शनचा समावेश आहे. 



पाचही आरोपींना शनिवारी अकोला न्यायालयात हजर केले होते. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी अभियोक्ता मिनाक्षी बेलसरे व तपास अधिकारी हटवार यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी लावून धरली. या आरोपीकडे रेडमीसिव्हर इंजेक्शनचा मोठा साठा असल्याची शक्यता असल्या कारणाने तसेच काळाबाजार करणाऱ्यांमध्ये आणखी काही आरोपी आहेत का ? याचा शोध घेण्यासाठी पोलिस कस्टडीची गरज आहे असे सरकारतर्फे न्यायालयात सांगण्यात आले होते. 



अन्न व औषधी प्रशासन विभागातील औषध निरीक्षक संजय मोहन सिंग राठोड यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून सिव्हील लाईन पोलीस ठाण्यांमध्ये या पाचही आरोपी विरुद्ध औषधी व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, औषधे किंमत नियंत्रण अत्यावश्यक वस्तू सेवा अधिनियम  या कलमांखाली गुन्हे नोंदविले गेले आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टिप्पण्या