Political:Maharashtra: पंतप्रधान मोदी तेंव्हाही 'नमस्ते ट्रम्प' मध्ये व्यस्त, आताही दुर्लक्षित धोरण- नाना पटोले यांनी सोडले टीकास्त्र





भारतीय अलंकार 24

मुंबई: कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत सर्वोच्च न्यायालयातील ५० टक्के कर्मचारी कोरोना संक्रमीत झाल्याने कोर्टाचे कामकाज ऑनलाईन घ्यावे लागत आहे. मागील वर्षी कोरोना महामारी आली तेव्हाही तातडीने पावले उचलण्याऐवजी ‘नमस्ते ट्रम्प’च्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यस्त होते, अशी टीका कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.




देशात कोरोना संक्रमण वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारण करीत असून,ज्या राज्यात कोरोना वाढत आहे,तेथे सहकार्य करण्या ऐवजी दुर्लक्षित धोरण केंद्र सरकार अवलंबित आहे,अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसने केली असून,या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघाती आरोप नाना पटोले यांनी आज केले आहेत. मंगळवारी ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


रामभरोसे कारभार

देशभरात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाबमध्ये भयानक स्थिती असताना आता हे संक्रमण देशाच्या इतर भागातही पसरू लागले आहे. देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना या महामारीवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर देणे नितांत गरजेचे असताना १३० कोटी जनतेला रामभरोसे सोडून पंतप्रधानांना विधानसभा निवडणुका महत्वाच्या वाटतात, असा बेफिकीर, बेजबाबदार पंतप्रधान गेल्या ७० वर्षात देशाने पाहिला नाही,असे देखील प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले म्हणाले.


दरम्यान, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यातील कोरोना रुग्ण आता वेगाने वाढत आहेत. दररोज चार-पाच हजार लोकांना कोरोनाचे संक्रमण होत आहे. या राज्यातील रुग्णवाढीचा वेग दररोज झपाट्याने वाढत आहे. याच वेगाने रुग्ण वाढत राहिले तर या राज्यातील परिस्थितीही हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही,असे देखील पटोले यांनी म्हंटले आहे.


महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती भयानक  तर गुजरातमधील आरोग्य व्यवस्था  कोलमडली


मोदींचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, देशात कोरोनाचे दररोज दीड-पावणे दोन लाख रुग्ण आढळत आहेत तर मृत्यूचे आकडेही अंगावर शहारे आणणारे आहेत. रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत, लसींअभावी लसीकरण केंद्रे बंद करावी लागत आहेत. रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे, रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी रांगा लागत आहेत आणि अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही एम्ब्युलन्सच्या रांगा लागल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती भयानक आहे तर गुजरातमधील आरोग्य व्यवस्था पुर्णपणे कोलमडून पडली आहे. गुजरात सरकारने जनतेला रामभरोसे सोडले आहे, असे ताशेरे गुजरात उच्च न्यायालयाने ओढले आहेत. देशातील कोरोनाचे भयावह चित्र पाहवत नाही पण देशाचा प्रधानमंत्री मात्र पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत हजारोंच्या सभा घेण्यात व्यस्त आहे,असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.


जाहीरातीतून जनतेला कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः मात्र प्रचारसभांसह अनेक कार्यक्रमात मास्क घालत नाहीत, अशा पंतप्रधानांचा लोकांनी काय आदर्श घ्यावा,असा टोला देखील नाना पटोले यांनी हाणला.




परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्यात वेळकाढूपणा केला. कोरोनाने देशात हातपाय पसरले त्यानंतर अचानक चार तासांचा वेळ देत मोदींनी मनमानी पद्धतीने लॉकडाऊन लावून देशाला अराजकाच्या संकटात ढकलले. कसलाही विचार न करता लहरीपणाने निर्णय घेऊन देशाला वेठीस धरण्याचा काम केले. लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले, लाखो बेरोजगार झाले. व्यापारी, दुकानदार, हातावरचे पोट असलेले कष्टकरी, कामगार यांचे प्रचंड हाले झाले पण यातून मोदींनी कोणताच बोध घेतला नाही. 


दिल्लीच्या तख्तावर सात वर्षांपासून सुरु असलेल्या ‘तुघलकी’ कारभाराने देशाची जनता होरपळून निघत आहे, असे देखील नाना पटोले म्हणाले.












टिप्पण्या