Lockdown:Maharashtra: कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई करा- शंभूराज देसाई

*राज्यातील विभागीय परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांच्याशी संवाद




सातारा :  कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करुन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा, अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी बुधवारी पोलीस प्रशासनाला केल्या.




राज्यमंत्री श्री. देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी या सूचना केल्या.



पोलीसही बाधित होत आहेत, या बाधित पोलिसांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोविड सेंटर सुरु करा. यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्या. तसेच जिल्हा नियोजन मधून निधी देण्यात येईल. बाजारपेठांमधील गर्दी हटविण्याचे काम  पोलीस करीत आहेत त्यांना महानगर पालिकेचे कर्मचारी, नगर परिषदेचे कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही श्री.देसाई यांनी केल्या.


कोणत्याही क्षणी शासन कडक निर्बंध लागू करेल यासाठी पोलीस दलाची बंदोबस्त, नाकेबंदी इत्यादी संदर्भाची तयारी असली पाहिजे. केंद्र शासनाने १८ वर्षावरील सर्व व्यक्तींना लसीकरण  देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्दी होऊ नये याबाबत तयारी पोलीस प्रशासना मार्फत करण्यात यावी. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग येत असतील अशा पोलीस ठाण्यात अधिकचा पोलीस बंदोबस्त  ठेवण्यात यावा. बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलीस वेलफेअर फंडामधून अधिकाऱ्यांना छावणीच्या ठिकाणी फुड पॅकेट, पाणी, प्राथमिक आरोग्याच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. असे सांगून गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई म्हणाले, रात्रीच्या बंदोबस्तासाठी महिला कर्मचाऱ्यांना नेमण्यात येऊ नये त्याचबरोबर ५० वर्षावरील पोलीसांना बंदोबस्त न देता कार्यालयीन काम, पोलीस स्टेशन मधील काम या ठिकाणी नेमणूक देण्यात यावी.


पोलीस यंत्रणा समाजामध्ये कायद्या व सुव्यवस्था ठेवण्याचे काम करत असल्याने अहोरात्र काम करत असते. सामान्य जनतेमध्ये त्यांना फिरावे लागते यामुळे कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आरोग्याबाबत पोलीस दलाने दक्षता घ्यावी. कोरोना उपचारासाठी पोलीस वेलफेअर फंडातून पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी कोविड सेंटर उभारता येईल का याबाबत उपाययोजना करावी. असे सांगून गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई म्हणाले, पोलीस दलातील प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे. पोलीस दलाला सुरक्षा कवच विमा लागू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. नागरिकांनी मास्क, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर , सुरक्षित अंतर याचे पालन केले पाहिजे याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असे आवाहनही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शेवटी केले.



टिप्पण्या