Lockdown in Akola: 'मॉर्निंग, इव्हनिंग अँड नाईट वॉक' ला जाणाऱ्या नागरिकांवर आता पोलिसांची नजर; आज सकाळी विनाकारण फिरणाऱ्या ६३ जणांवर गुन्हे दाखल

                                     File photo




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यभर lockdown घोषित केले आहे. मात्र,बेफिकीर आणि बेजबाबदार असलेले काही नागरिक विनाकारण रस्त्याने फिरताना दिसतात. अकोला शहरातही असे परिस्थितीचे गांभीर्य नसलेले नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. 'मॉर्निंग,इव्हनिंग, नाईट वॉक' व व्यायामाच्या नावाखाली खुलेआम विना मास्क फिरताना दिसत आहेत. आज सकाळी अकोला शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या अश्या एकूण ६३ लोकांवर अकोला पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्या कारणाने गुन्हे दाखल केले आहेत.



शहरात मॉर्निंगच नव्हेतर इविनिंग आणि नाईट वॉकचा प्रकारही वाढला आहे.  जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोरून कितीतरी नागरिक नियमित सकाळ, संध्याकाळ आणि रात्री फिरायला जाताना सामान्य नागरिकांना दिसतात, पण पोलिसांना दिसत नाहीत, ही आश्चर्याची बाब आहे. एसपी ऑफिस समोरील रस्त्यावरचं नाहीतर गोरक्षण रोड, गीता नगर, उमरी रोड, जठारपेठ, डाबकी रोड वाशिम बायपास रोड, आदी भागात मोठ्या प्रमाणात नागरिक फिरण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. यामध्ये विशेषतः प्रौढ महिला आणि युवा मुला मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.




जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन


* यापुढे सकाळी तसेच संध्याकाळी विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास आपल्यावर गुन्हे दाखल केले जातील.


*आज केलेल्या कारवाईमध्ये तरुण मुलांचे प्रमाण जास्त दिसत आहे. 


*सर्व पालकांना अकोला जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन आहे की, आपल्या मुलांना पुढचे काही दिवस घरीच राहायला सांगावे.


तसेच सर्व नागरिकांना प्रशासनातर्फे नम्र विनंती करण्यात येते कि विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नका. कृपया शासनाच्या नियमांचे पालन करावे. सर्व आपल्या सुरक्षिततेसाठी चालले असून सर्वांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे.





टिप्पण्या