Good friday 2021: कोरोना विषाणूच्या संकटातून संपूर्ण जगाची सुटका होण्यासाठी परमेश्वराकडे याचना

   गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा




भारतीय अलंकार 24

अकोला: शहरासह संपूर्ण जिल्हयात गुडफ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवारचा सण 2 एप्रिल रोजी ख्रिश्चन धर्मिय बंधू भगिनींनी मोठया भक्तीभावाने साजरा केला. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत हा सण साजरा करण्यात आला. 




"प्रभू येशू यांनी जगाला क्षमा,  प्रेम, त्याग, बंधुभाव यांची शिकवण दिली, त्या शिकवणीचे आचरण करून एकमेकांना क्षमा करण्यातच जीवनाचे खरे मर्म आहे."

-रेव्हरंड निलेश अघमकर 



                                                          अकोला शहरातील आठ चर्चेससह जिल्हयातील सुमारे तीस चर्चेस मधून आणि आपापल्या निवासस्थानांमधून धर्मगुरूंनी फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून ख्रिश्चन बंधू भगिनींसोबत संवाद साधला. दरम्यान, प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरूत्थाना निमित्त जगभरात उद्या, रविवारी ख्रिश्चन धर्मीय ईस्टर संडे हा सण साजरा करणार आहेत. त्यादिवशीही समाजमाध्यमांचा प्रार्थना सभांसाठी वापर करण्यात येणार आहे.



प्रभू येशू ख्रिस्तांनी मानवाच्या पापक्षालनासाठी क्रूस खांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण साजरा केला जातो. 




अकोला शहर आणि जिल्ह्यातील चर्चे आणि  शहरातील प्रमुख चर्चेच्या धर्मगुरूंनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी प्रार्थना सभा आयोजित केली होती. या प्रार्थना सभेमध्ये चर्च आणि धर्मगुरूंच्या कुटुंबातील सदस्य सोशल डिस्टन्सिगचे भान ठेवून सहभागी झाले. दरम्यान, काही चर्चेसमध्ये कोरोना नियमांचे पालन करीत तर शंभराहून अधिक सदस्य असलेल्या चर्चच्या सदस्यांसोबत धर्मगुरू यांनी व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. 



ख्रिश्चन कॉलनी

यावेळी त्यांनी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलमधील वचनांचा आधार घेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या घटनेवर प्रकाश टाकला.  खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेविअर्स अलायन्स चर्चचे रेव्हरंड निलेश अघमकर तसेच वैशाली डोंगरदिवे, राजेश ठाकूर, अमित ठाकूर, मीना बिरपॉल, मीनाक्षी वर्मा, सुवार्ता ढिलपे यांनी प्रभू येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर खिळलेल्या अवस्थेत असताना उच्चारलेल्या सात वाक्यांवर बायबलच्या वचनांच्या आधारे भाष्य केले.   




काही चर्चेस मध्ये धर्मगुरूंनी आपापल्या घरांमधूनच फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून ख्रिश्चन बंधू भगिनींसोबत संवाद साधला. यावेळी  ख्रिश्चन बंधू भगिनी यांनी  गुडफ्रायडेनिमित्त विविध गीतेही सादर केली.  




लेन्थचा पवित्र महिना

गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांचा लेन्थचा पवित्र महिना सुरू होता. या काळात ख्रिश्चन बंधू भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात, घरोघरी कॉटेज प्रेअरचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोरोनामुळे या कॉटेज प्रेअर्स रदद करण्यात आल्या. सर्वांनी चाळीस दिवस आपल्या घरामध्ये प्रार्थना केल्या. कोरोना विषाणूच्या संकटातून केवळ राज्य आणि देशच नव्हे तर संपूर्ण जगाची सुटका व्हावी, यासाठी परमेश्वराकडे याचना व प्रार्थना करण्यात आली. 



इस्टर संडे


दरम्यान, रविवारी प्रभू येशूंच्या पुनरूत्थाना निमित्त ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चच्या प्रांगणात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रात:कालीन प्रार्थना आणि सकाळी ९ वाजता प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी निघणारी दिंडी मात्र रदद करण्यात आली आहे. रविवारीही काही धर्मगुरू आपल्या निवासस्थानी प्रार्थना सभा घेतील. त्याचे फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून सर्वत्र थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती  चर्चेसच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी दिली.


टिप्पण्या