Corona impact: Akola: प्रशिक्षित डॉक्टरांच्या नियुक्त्या नसल्याने शिकाऊ डॉक्टरांच्या खांद्यावर कोरोना रुग्णसेवेचे अतिरिक्त ओझे ; विद्यार्थ्यांचे होताहे शैक्षणिक नुकसान

The additional burden of corona patient care on the shoulders of the trainee doctor due to lack of trained doctor appointments;  Educational loss of students (photo:BA news24)




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय मधील covid-19 च्या रुग्णांना सेवा देण्याचा अतिरिक्त भार शिकाऊ डॉक्टरांच्या खांद्यावर पडला आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी covid-19 साठी स्वतंत्र स्टाफ नेमण्याची मागणी केली आहे. अन्यथा काम बंद करण्याची चेतावणी प्रशासनाला  दिली आहे. विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या या पवित्र्यामुळे आता सर्वोपचार रुग्णालयात  covid - 19 सोबत Non covid-19 रुग्णसेवा ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




फेब्रुवारी पासून देशात कोरोनाची दुसरी लाट उसळली. अकोल्यातही रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार मधील शिकाऊ डॉक्टर यांच्या खांद्यावर कोविड रुग्णांचे अतिरिक्त ओझे प्रशासनाने दिले.  या सर्वामध्ये परीक्षेची पूर्वतयारी, अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे कोविड रुग्णांना सेवा देत असताना त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे येथील डॉक्टरांनी म्हंटले आहे.



प्रशासनाने शब्द पाळला नाही

कोविडच्या सुरुवातीच्या काळात कोविड संदर्भात कोणतेही प्रशिक्षण नसताना या शिकाऊ डॉक्टरांना महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने रुग्ण सेवेत सहकार्य करण्यास तात्पुरती नेमले. लवकरच प्रशिक्षित स्टाफ नेमण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. मात्र, वर्ष उलटून गेल्यावर देखील शब्द पाळला गेला नाही. आता या डॉक्टरांनी कोविडसाठी स्वतंत्र स्टाफ नेमण्याची मागणी केली आहे. रुग्णालयात त्वरित स्टाफ नेमावा; अन्यथा आम्ही काम बंद करू, असा इशारा विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिला असल्याचे शिकाऊ डॉक्टर नेहा कुलकर्णी हिने सांगितले.



मार्ड संस्थेचा विद्यार्थ्यांना पाठिंबा


सध्या अकोला सामान्य रुग्णालयात ४४ शिकाऊ डॉक्टर्स १० वॉर्ड मध्ये सेवा देत आहेत. यामध्ये ६ कोविड तर ४ कोविड संदिग्ध वॉर्डाचा समावेश आहे. त्याच बरोबर इतर आजारांसाठी आलेल्या विभागात सुद्धा सेवा द्यावी लागत आहे. शैक्षणिक नुकसान होत असून यासाठी स्वतंत्र स्पेशालिस्ट डॉक्टरांचा स्टाफ नेमा अन्यथा काम बंद आंदोलन करू, असा इशारा मार्ड संस्थेच्या माध्यमातून या शिकाऊ डॉक्टरांनी दिला असल्याने आता येथील रुग्णसेवा ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 




Covid-19 चे प्रशिक्षण नाही 

रुग्णालयात डॉक्टरांची पदे रिक्त असून सर्व भार शिकाऊ डॉक्टरांवर पडत असल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला आहे. मुळात त्वचारोग, स्त्रीरोग, नेत्ररोग या शिकाऊ डॉक्टरांचे शैक्षणिक विषय आहेत. त्यांना कोविड-19 चे कोणतेही प्रशिक्षण अद्यापही दिले नसल्याची माहिती आहे. शासनाने अनुभवी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक न केल्याने आम्हा विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य अंधारात दिसत आहे, अशा शब्दात शिकाऊ डॉक्टर प्रशांत उके याने यावेळी प्रतिक्रिया दिली.




कोरोनाचा वाढता प्रादुर्भावमुळे राज्यात मोठे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थिती आरोग्य विभागाने या शिकाऊ डॉक्टरांची मागणी पूर्ण न केल्यास अकोल्यातील सर्वोपचार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे चित्र बिघडायला वेळ लागणार नाही, एवढे मात्र निश्चित.




टिप्पण्या