Akot road: युवकाच्या मृत्यु प्रकरणी रुग्णवाहिकेच्या मालक व चालकवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्री यांचे आदेश




भारतीय अलंकार 24

अकोला: अकोट- अकोला मार्गावर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 108 रुग्णवाहिकेत 19 वर्षीय युुवकाच्या मृत्यू प्रकरणी संबंधित मालक व चालकावर  फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आज पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.




अकोट तालुक्यातील वणी वरुळा येथील 19 वर्षीय युवकाचा रुग्णवाहिकेची मध्ये मृत्यू झाला होता. या मार्गावर रुग्णवाहिकाचे टायर पंक्चर झाले होते. तसेच गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त साहित्य नव्हते. याशिवाय दुसरी रुग्णवाहिका सुद्धा वेळेवर पोहोचली नाही. त्यामुळे उपचारा अभावी या मुलाचा मृत्यू झाला होता, ही बाब प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल गावंडे यांनी पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. पालकमंत्री यांनी गांभीर्य ओळखून संबंधित रुग्णवाहिकेच्या कंत्राटदारावर कर्तव्यात निष्काळजी व बेजबाबदार वागण्याचा ठपका ठेवत फोजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे,असे आदेश दिले आहेत.


रोशन पळसपगारच्या मृत्यूला जबाबदार कोण? 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आधीच कुचकामी ठरलेल्या आरोग्य यंत्रणेचा तिघलुकी कारभार या घटनेमुळे अजून एकदा समोर आला आहे. मात्र, या संतापजनक घटनेला केवळ आरोग्य यंत्रणेलाच जवाबदार आहे की, रस्ते व वाहतूक विभाग की राजकीय पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी की स्थानिक प्रशासन की रस्ता बांधकाम ठेकेदार,की फोटोसेशन पुरते सामाजिक कार्य करणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते? या सोबतच अनेक प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केले. मात्र हे सर्व समाजचिंतक एकमेकांना दोष देऊन एकमेकांकडे बोट दाखवून ती ढकलत राहतात. मात्र, या चक्रव्यूहात सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. पण याचे सोयरसुतक कुणालाच नसते. रोशन पळसपगार सुद्धा याच परिस्थितीचा बळी ठरला आहे.




रस्त्याची दुरवस्था आणि ऍम्ब्युलन्समध्ये पर्यायी चाक ( स्टेपनी ) नसल्याने एका संदिग्ध कोरोना रुग्णांचा अकोल्यातील चोहट्टा बाजार जवळ ऍम्ब्युलन्समध्येच मृत्यू झाला,ही दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली होती.  



अकोला ते अकोट या मार्गाचे काम बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. नव्हे रखडले आहे. या रस्ता निर्माणच्या ठेकेदाराच्या चुकी मुळे रस्त्याचे काम अर्धवट राहिले असल्याचे बोलले जाते. याच अत्यंत  खराब रस्त्यामुळे गाडी (रुग्णवाहिका) पंक्चर झाली; आणि हेच  रोशन पळसपगारच्या मृत्यूचे निमित्त मात्र कारण ठरले. 




श्वासाचा (श्वसन) त्रास होत असल्याने १९ वर्षीय रोशनला संबंधित डॉक्टरांनी अकोटहुन अकोला येथे रेफर केले. मात्र, अकोट-अकोला या मार्गाने प्रवास सुरू असताना मधेच रुग्णवाहिका पंक्चर झाली. रुग्णवाहिका चालकाने पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मार्गाने पर्यायी व्यवस्था होवू शकली नाही. वेळेवर मदत न मिळाल्याने आणि रुग्णवाहिकेत स्टेपनी देखील नसल्याने रोशनला आपले प्राण गमवावे लागले. रोशनच्या नातेवाईकांना  डोळ्यासमोर आपला तरुण मुलगा मृत्यूच्या दारात जाताना पहावा लागला.




या घटनेनंतर आता रुग्णवाहिका सेवेचा कारभार उजेडात आला.तर कुचकामी  आरोग्य यंत्रणेचा परत एकदा बोजवारा उडाला असल्याचे सामान्य नागरिकांना कळले.



काय आहे हे प्रकरण

आजारी असलेल्या रुग्णाला उपचारार्थ अकोला येथे घेऊन जाणारी रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे रुग्णाचा उपचाराला पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना दि. २ एप्रिल रोजी अकोट-अकोला मार्गावर घडली. रोशन निरंजन पळसपगार (१९), असे मृत रुग्णाचे नाव आहे.




अकोट तालुक्यातील वणीवारुळा येथील रोशन निरंजन पळसपगार (१९) हा युवक आजारी असल्याने अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आला होता. त्याची प्रकृती गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालयाने (क्र. एमएच १४ सीएल ०८१३) १०८ रुग्णवाहिकेतून अकोला येथे पाठविले. अकोट-अकोला मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाने जात असताना पळसोद फाट्यानजीक रुग्णवाहिकाचे मागील चाक पंक्चर झाल्याने रुग्णवाहिका बंद पडली. रुग्णवाहिका मध्ये पर्यायी स्टेपनी उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका जागीच बंद होती. दुसरा पर्याय शोधण्यास रुग्णवाहिकेला तब्बल २ तास ३० मिनिटे वेळ लागला. या वेळेत प्रकृती गंभीर असलेल्या रोशनचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाला. रुग्णवाहिकेत पर्यायी व्यवस्था असती, तर वेळेवर रुग्णाला उपचार भेटून अरुण वाचला असता; परंतु रुग्णवाहिका सुसज्ज नसतानाही चालकाने निष्काळजी केल्याचे दिसून आले. रुग्णांसाठी अन्य वाहन उपलब्ध केले नसल्याने रुग्णवाहिकेत युवकाला जीव गमावावा लागल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. 




ग्रामीण रुग्णालयातून अकोला येथील रुग्णालयामध्ये घेऊन जात असतानाच रुग्णाची परिस्थिती खूप नाजूक होती. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांकडून लिहून घेतले होते. रुग्णवाहिकाचे चाक पंक्चर झाले. दुसरी पर्यायी व्यवस्था नव्हती, तसेच दुसरी रुग्णवाहिका यायला वेळ लागल्यामुळे रुग्ण दगावला, अशी प्रतिक्रिया रुग्णवाहिके सोबत असलेल्या डॉ. रेशमा कंकाळ यांनी व्यक्त केली होती.




अकोट-अकोला मार्गावर आणखी किती बळी जाणार?

अकोट-अकोला मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. या मार्गाचे काम तातडीने करण्यासाठी कंत्राटदार दिरंगाई करीत आहे. रस्त्यावर गिट्टी, दगड पडलेले असून, अनेकदा वाहने पंक्चर होत आहेत. दरम्यान, रुग्णवाहिका पंक्चर झाल्याने युवकाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला. अकोट-अकोला मार्ग आणखी किती जणांचा बळी घेणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे, तसेच रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा व कंत्राटदाराच्या कामचुकारपणामुळे अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. रुग्णवाहिकेच्या कंत्राटदारा सह या रस्त्याच्या ठेकेदारावर देखील गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे. तसेच पालकमंत्री बच्चू कडू यांनी या मार्गाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.






टिप्पण्या