10th-12th exams : मोठा निर्णय: दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली; मे मध्ये बारावीची तर दहावीची परीक्षा जून मध्ये होणार- शिक्षणमंत्री गायकवाड यांची घोषणा

10th-12th exams postponed; 12th exams to be held in May and 10th exams to be held in June: Education Minister Gaikwad





भारतीय अलंकार 24

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दुपारी केली आहे. दहावीची परीक्षा जून तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.


शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज सकाळी महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.




दहावी बारावी विद्यार्थ्यांचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या दरम्यान लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी जी काही चर्चा झाली ती आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाने जो निर्णय घेतला आहे, तो सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्ड यांनी देखील घ्यावा असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे. 



शिक्षण विभागाची बैठक


नियोजन आणि परिपूर्ण तयारी करावी- मुख्यमंत्री


राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता १२ वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर इयत्ता १० वीच्या परीक्षा जून महिन्यात घेण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे, त्यादृष्टीने परिपूर्ण तयारी करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.




राज्यातील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या बदलाबाबत इतर परीक्षा मंडळांना अवगत केले जावे तसेच सुधारित नियोजनानुसार पुढील वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत जाहीर केले जावे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.




मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बैठक आज घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,  पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,  राज्यमंत्री बच्चु कडू, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेश शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड,  माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील , राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.




१२वीच्या परीक्षा सुधारित कार्यक्रमानुसारच  घ्याव्यात



१२ वीच्या परीक्षा घोषित सुधारित कार्यक्रमानुसारच घेतल्या जाव्यात. हे करतांना १२ वीच्या विद्यार्थ्यांना  पुढे आय.आय.टी, जेईई आणि नीट च्या परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात  प्रवेश घ्यावयाचे असतात हे लक्षात घ्यावे,  त्यांचे नुकसान होणार नाही,  याची काळजी घ्यावी अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.



तयारी पूर्ण करा, एसओपी तयार करा


आपण ज्या तारखांना १२ व्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेता याव्यात यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी. केंद्रांची संख्या वाढवावी, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती निश्चित कराव्यात,  मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर (विरळ) बसवावे, परीक्षा केंद्राची, प्रसाधनगृहांची स्वच्छता, त्यांचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे.  परीक्षांच्या आयोजनासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे, दरम्यानच्या काळात परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. याची एक परिपुर्ण आणि सुनियोजित कार्यप्रणाली(एसओपी)  शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.




वंदना कृष्णा यांनी यासंदर्भातील विभागाचे सादरीकरण केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री बच्चु कडू, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे उपस्थित अधिकारी यांनी आपली मते आणि भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.



टिप्पण्या