Sachin Waze : सचिन वाझे यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी घेतली उच्च न्यायालयात धाव; अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप

Sachin Waze's brother Sudharma Waze runs in High Court;  Allegation that the arrest was illegal




सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस (writ of habeas corpus) दाखल करून अटकेवर  घेतली हरकत




भारतीय अलंकार 24

मुंबई : स्कॉर्पिओ कार मधील स्फोटक प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केलेले निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांनी हेबियस कॉर्पस writ of habeas corpus (कैद्याला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्याची लेखी आज्ञा) दाखल केली आहे. 




सचिन वाझे यांना एनआयएने बेकायदेशीररीत्या अटक केली असल्याचे याचिकेत म्हंटले आहे. तर राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांनी त्यांचा 'बळीचा बकरा' केला आहे, असा आरोप देखील याचिकेद्वारे सुधर्म वाझे यांनी केलेला आहे.



 

काय आहे घटना


प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर काही दिवसांपूर्वी जिलेटीनच्या कांड्या भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती. या कारचा मालक मनसुख हिरन यांचा काही दिवसांपूर्वी अचानक मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कळव्याच्या खाडीजवळ आढळला. या प्रकरणात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. परिणामी सरकारने वाझे यांची क्राईम ब्रँच मधून उचलबांगडी केली. मात्र, काहीही कारवाई न केल्याने एनआयएने या प्रकरणात हस्तक्षेप करत वाझे यांच्यावर गुन्हा नोंदवला. तीन दिवसांपूर्वी त्यांची जवळपास ११ तास चौकशी केली आणि त्याच रात्री त्यांना अटक केली. दरम्यान, ठाणे न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर सचिन वाझे यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.




सुधर्म यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल करून वाझे यांच्या अटकेवर हरकत घेतली आहे. सचिन वाझे यांना न्यायालयात हजर करण्यात यावे आणि त्यांची सुटका करण्यात यावी, अशी  मागणी याचिकेद्वारे केली आहे. 




मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांनी सचिन वाझे यांना 'बळीचा बकरा' केला आहे, असा आरोप याचिकेद्वारे सुधर्म वाझे यांनी केला आहे.




सचिन वाझे यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. त्यांना  ४१(ए) अंतर्गत  नोटीस न देता तसेच एफआयआरची प्रतही देण्यात आली नाही. त्यांना अटकेचे कारणही सांगण्यात आले नाही. अशाप्रकारे एनआयएने फौजदारी दंड संहिताचे उल्लंघन केले आहे. एनआयएने वाझे यांना अटक करण्यासाठी केलेल्या घाईवरून त्यांचा कुहेतु स्पष्ट होतो. एनआयए जाणुनबुजून कायद्याचे पालन करत नाही आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे. 




वाझे यांचा फरार होण्याचा विचार नाही. त्यांनी चौकशीसाठी एनआयएला सहकार्य केले. वाझे हे गेले १७ वर्षे मुंबई पोलीस दलात उच्च पदावर काम करत आहेत, असे देखील याचिकेत म्हटलेले आहे.




दरम्यान, संशयित स्कॉर्पिओच्या मागे एका इनोव्हा गाडीत सचिन वाझे यांना दोन वेळा पाहिले गेले होते. ही इनोवा गुन्हा अन्वेषण विभागाची असून त्याचा वापर वाझे करत होते. एनआयएने या संदर्भात दोन ड्रायव्हर आणि दोन अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यांची ओळख पटली असून आता एनआयसाठी हा सर्वात महत्वाचा पुरावा मानला जात आहे. 




दुसरीकडे सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशी दरम्यान मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता NIA या अधिकाऱ्याला चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी काही कायदेशीर गोष्टींची पूर्तता करण्याची गरज असल्याचे या अधिकाऱ्याच्या चौकशीला आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.




मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने १४ ते २५ मार्च अशी १२ दिवसांसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) कोठडी मंजूर केली आहे. शनिवारी रात्री वाझे यांना एनआयएने अटक केली होती. त्यापूर्वी शुक्रवारी वाझे यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने त्या संदर्भातील सुनावणी १९ मार्च रोजी ठेवली आहे.


टिप्पण्या