Palm Sunday 2021: अकोल्यात पाल्म संडे भक्तिभावाने साजरा

Palm Sunday celebrated with devotion in Akola




भारतीय अलंकार 24

अकोला: वधस्तंभावर खिळले जाण्यापूर्वी सहा दिवस अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेम शहरात जय उत्सवाने प्रवेश झाला. त्या दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण जगभरात आजचा रविवार हा पाल्म संडे म्हणून साजरा करतात. याला झावळ्यांचा रविवार असेही म्हणतात. अकोला शहर आणि जिल्ह्यातही आज हा सण कोरोना संदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळून काही मोजक्या लोकांच्या उपस्थिती मध्ये भक्तिभावाने साजरा करण्यात आला. 



दिंडी निघाली नाही


17 फेब्रुवारी पासून ख्रिश्चन धर्मियांच्या लेंथ या पवित्र महिन्यास सुरुवात झाली. दरवर्षी या पवित्र महिन्यात ख्रिश्चन धर्मीय घरोघरी कॉटेज प्रेयरचे आयोजन करतात. पाल्म संडेच्या दिवशी विदर्भातील एकमेव अशा ख्रिश्चन कॉलनी मधून झावळ्या हाती घेऊन आबालवृद्ध मोठी दिंडी काढतात. यावेळी होसान्ना होसान्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादीत असो अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात. परंतु या वर्षी कोरोना मुळे या सर्व परंपरागत बाबींना फाटा देण्यात आला. 



मोजक्या लोकांची उपस्थिती

अकोला शहरातील आठ आणि जिल्ह्यातील सुमारे 30 चर्चेस मधून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध धार्मिक गीते सादर करण्यात आली. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना प्रवेश मनाई करण्यात आली होती. सामाजिक अंतर राखीत, मास्क परिधान करून आणि हातात झावळ्या घेऊन पाल्म संडे जगाचे कोरोना पासून संरक्षण व्हावे, अशी प्रार्थना करून भक्तिभावाने साजरा करण्यात आला. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेविअर्स अलायन्स चर्च मध्ये रेव्हरंड निलेश अघमकर यांनी पवित्र बायबल मधील वचनांच्या आधारे सामाजिक संदेश दिला. 



Good friday प्रार्थना सभेचे थेट प्रसारण

येत्या शुक्रवारी प्रभू येशूच्या वधस्तंभावरील बलिदानाची आठवण म्हणून गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण भक्तीभावाने  साजरा करण्यात येईल. यावेळी बायबल अभ्यासक प्रभू येशूच्या वधस्तंभावरील सात वाक्यांवर प्रकाश टाकतील. या प्रार्थना सभेचे समाज माध्यमावर थेट प्रसारण करण्याची व्यवस्था विविध चर्चनी केली आहे. त्यामुळे घरी राहूनच ख्रिश्चन धर्मीय या प्रार्थना सभेत सहभागी होऊ शकतात. सर्व चर्चेस मध्ये प्रमुख मंडळी आणि इतर 15 ते 20 लोक उपस्थित राहतील, असे आवाहन करण्यात आले आहे. 



ईस्टर संडे 

त्यानंतर 4 एप्रिल रोजी रविवारी संपूर्ण जगभर ईस्टर संडे अर्थात प्रभू येशू यांचा पुनरुत्थान दिन मोठ्या उत्साहात चर्चेस मध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि घरोघरी साजरा करण्यात येईल, या वेळी आयोजित प्रार्थना सभेचे देखील समाज माध्यमातून थेट प्रसारण करण्यात येणार आहे, अशी माहिती रेव्हरंड निलेश अघमकर, जस्टिन मेश्रामकर,  सरला मेश्रामकर, अरविंद बीरपाल, अजय वर्मा, राजेश ठाकूर, अमित ठाकूर, चंद्रकांत ढिलपे यांनी दिली आहे.

टिप्पण्या