crop insurance : शेती पीक विमा प्रश्नावर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचा ठिय्या…

Akola: Thousands of farmers, led by Ravikant Tupkar, sit on agricultural crop insurance issue


*12 वाजता पासून ठिय्या आंदोलन 


*अकोला जिल्ह्यातील केळी - फळ उत्पादक शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनीने फसविले  


*शेतकऱ्यांना पीक विमा मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही



भारतीय अलंकार 24

अकोला : फळ पीक विम्याच्या दाव्याची अत्यल्प रक्कम मंजूर झाल्याचा आराेप अकोला जिल्ह्यातील अकाेट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. या शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर केळीचे खांब घेऊन धडक मोर्चा काढला.




मे 2020 मध्ये नैसर्गिक संकटामुळे अकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे हेक्टरी किमान ४५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते. मात्र, काही शेतकऱ्यांना २६४ तर काहींना ६०० ते ७०० रूपये अशी अत्यल्प रक्कम कंपनीने मंजूर केली. पीक विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांशी एकेरी भाषा बोलून गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचे पुरावे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे यावेळी सादर केले. 



शिदोरी सोबत आणली

एकीकडे राज्य सरकार या नुकसान भरपाई पाेटी १८ हजार रुपये प्रती हेक्टरी मदत देत असताना विमा कंपनी मात्र शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विमा कंपनी अधिकाऱ्यावर कारवाई करून सर्वांना सारखा मोबदला देण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले, तर सोबत आणलेली शिदोरी परिसरातच खाल्ली. यानंतर शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळवून देण्याचे लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.




शेतकऱ्यांना पूर्णपणे नुकसान भरपाई मिळावी-तुपकर

भारतीय कृषी विमा कंपनीने वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी. यावर्षीचा अहवाल देखील तयार करून पूर्णपणे १०० टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. आजच्या बैठकीला कंपनीचे प्रतिनिधी दामोदर सपकाळ उपस्थित नव्हते. जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न गांभीर्याने घेवून कंपनीवर कारवाई करावी. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असे रविकांत तुपकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.


टिप्पण्या