Covid test: कोविड चाचणी अहवाल नसल्यास दुकाने सिल करा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश; सोमवार पासून दुकानांची तपासणी होणार

                                      file photo


 

भारतीय अलंकार 24

अकोला: जिल्ह्यात सोमवार २२ मार्च पासून दुकानांची तपासणी करण्यात येणार असून, ज्या दुकानदाराकडे कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल नसेल त्यांची दुकाने सिल करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले. तसेच ग्रामीण भागात जेष्ठ नागरिक तसेच सहव्याधी असणाऱ्या लोकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.




या संदर्भात जिल्हा टास्क समितीच्या बैठकीत आज चर्चा झाली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, वैद्यकीय महाविद्यालय सह अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, डॉ.अंभोरे, डॉ.दिनेश नैताम, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य संबधीत अधिकारी उपस्थित होते.




दुकानांची तपासणी सोमवार पासून


यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, जिल्ह्यात सोमवार पासून (दि.22) दुकानांचे तपासण्या सुरु कराव्यात. दुकानदारांनी स्वतः व आपले कामगार यांच्या कोविड चाचण्या करणे आवश्यक आहे आणि चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल तरच दुकान सुरू ठेवावे, असे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. यासंदर्भात आता जिल्ह्यात ठिकठिकाणी चाचणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दुकानदारांनी आपल्या नजिकच्या चाचणी केंद्रावर जाऊन चाचणीसाठी नमुने द्यावेत. आपला अहवाल निगेटिव्ह आल्यास दुकाने सुरू करावीत, अशी अपेक्षा आहे. या सुचनेचे पालन करून दुकानदारांनी प्रशासनास सहकार्य करावे. तथापि दुकानांची तपासणी सोमवार दि.२२ पासून सुरू होणार आहे. यावेळी उघड्या असणाऱ्या दुकानांच्या मालक व नोकर यांचे चाचणी अहवाल नसल्यास त्या दुकानांना सिल करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.




ग्रामीण भागात लसीकरणास प्रतिसाद द्यावा


जिल्ह्यात कोविड लसीकरणही सुरु आहे. तुलनेने ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. तरी ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करुन घ्यावे. विशेषत: 60 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षे वयावरील व सहव्याधी असणाऱ्या सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.




ताप सदृश्य आजारात कोविड चाचणी करणे आवश्यक


जिल्ह्यातील लहान मोठया खाजगी रुग्णालयात ताप, खोकला, कफ इत्यादी सदृश्य आजाराचे रुग्णांवर उपचार करताना या रुग्णांच्या कोविड चाचण्या करणे आवश्यक आहे. तथापि चाचण्या न करता उपचार सुरु ठेऊन नंतर अत्यवस्थ रुग्ण हे शासकीय इस्पितळात संदर्भीत केले जातात. अशा रुग्णांच्या संदर्भांत संबंधित डॉक्टर्सवर जबाबदारी निश्चित करा, असे निर्देश जिल्हाधिकऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

टिप्पण्या