Akola crime: बीएसएफ कार्यरत सैनिकाच्या पत्नीला गावगुंडाने केली मारहाण; हिवरखेड पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

   पीडित महिला व तिचा मुलगा



भारतीय अलंकार 24

अकोला:  जिल्ह्यातील हिवरखेड पोलिसांच्या भूमिकेवर एका प्रकरणाने  प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तेल्हारा तालूक्यातील दानापूर येथे ९ मार्चला बीएसएफ कार्यरत एका सैनिकाच्या पत्नी आणि दहा वर्षीय मुलाला गावगुंडाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली. पीडित महिलेने रितसर पोलिसात तक्रार देवूनही आरोपीवर किरकोळ गुन्हे दाखल करीत समज देवून सोडून दिले. यामुळे आता हिवरखेड पोलिसांच्या भूमिकेवर पीडितेच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी व माजी सैनिक संघटनाने प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.



सुनिता जामोदकर असे या मारहाण झालेल्या सैनिक पत्नीचे नाव आहे. तर चिनू विखे असे आरोपीचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस गाव गुंडांवर मेहेरबान का?, असा सवाल या घटनेमुळे विचारला जात आहे. तर एका सैनिकांच्या पत्नीला मारहाण करणारा आरोपी पोलिसांचे अभय मिळाल्यामुळे सध्या मोकाट फिरत आहे, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. 




Cctv दृश्य

९ मार्च रोजी शेजारी राहणारा आरोपी चिनू विखे याने कारण नसतांना सुनिता यांना लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. मात्र, हिवरखेड पोलीसांनी आरोपीविरूद्ध थातुरमातुर कारवाई करीत किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. आरोपीला फक्त समज देत सोडून दिले आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.




सुनिता जामोदकर यांचे पती शिवदास हे बीएसएफमध्ये पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे कार्यरत आहेत. शिवदास यांनी काल पिडीत पत्नीसह जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेत, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्रिदल युनियन या माजी सैनिकांच्या संघटनेनेही यात कठोर कारवाईची मागणी केली आहे. एवढे प्रकरण होऊनही या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळाले नाही, अशी खंत शिवदास जामोदकर यांनी व्यक्त केली. तसेच याबाबत पोलीस खाते मौन बाळगून आहे. यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.   सात वर्षापासून पीडित महिला व आरोपी यांच्यात आपसी वाद आहेत. यामधूनच हा प्रकार घडला. या आधी देखील पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागितली होती. मात्र,अजूनही कुठलीच कारवाई झाली नाही,असे माजी सैनिक संघटनाच्या पदाधिकारी यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे.

टिप्पण्या