Political news: प्रकरण भोवले...संजय राठोड यांचा अखेर राजीनामा;मातोश्रीवर आता काय निर्णय होतो?



भारतीय अलंकार24

मुंबई: टिकटॉक फेम पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण विदर्भातील मंत्री संजय राठोड यांना चांगलेच भोवत आहे. या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मंगळवारी सकाळीच मातोश्रीवर आपला राजीनामा पाठविला.पण आता मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे हा राजीनामा स्वीकारणार का?, किंवा  मुख्यमंत्री हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवतील का?, हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.  


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

मूळची परळीची असलेली २२ वर्षीय पुजा चव्हाण पुण्यात शिकत होती. तिच्या भावासोबत ती  हडपसर भागात राहत होती. रविवारी मध्यरात्री तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली होती.  दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. 


पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचा खुलासा किंवा माहिती  पोलिसांनी दिलेली नाही. तसेच पूजाच्या कुटुंबियांनी देखील यावर काही भाष्य केलेले नाही. मात्र, हे संपूर्ण प्रकरण व्हायरल होत गेले आणि ते आता संजय राठोड यांच्या राजीनाम्या पर्यंत पोहोचले.


संजय राठोड यांचा राजकीय प्रवास


शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा २००४ साली यवतमाळ मधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.


त्यानंतर २००९ आणि २०१४ अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले.


फडणवीसांच्या २०१४ साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सह पालक मंत्री पदासह महसूल राज्यमंत्री पदाची धुरा सोपविण्यात आली.


२०१९ मध्ये  महाविकास आघाडीचे सरकार मध्ये त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रीपदाचा भार सोपविण्यात आला.


 भाजपाची मागणी


संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा, अशी पहिली आक्रमक मागणी भाजपने केली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात पहिल्यांदा संजय राठोड यांचे थेट नाव घेतले होते. 

टिप्पण्या