Football sport: ' वॉल ऑफ महाराष्ट्र' ओळख असलेले जेष्ठ फुटबॉलपटू पंढरीनाथ गोपनारायण काळाच्या पडद्याआड





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: 'वॉल ऑफ महाराष्ट्र' अशी ओळख असलेले जेष्ठ फुटबॉलपटू तथा सेवानिवृत्त रिझर्व पोलीस निरीक्षक पंढरीनाथ गोपनारायण यांचे आज गुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी निधन झाले. एक जिंदा दिल व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. 




खेळाडूंच्या हक्कसाठी ते नेहमी लढत होते. अकोला पोलिस दलाच्या या खेळाडूंनी  महाराष्ट्र पोलीस  फुटबॉल टीमचा पाया मजबूत करून एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले होते. एम एस पी चे  एक उत्कृष्ट स्टॉपर होते. त्यांना 'वॉल ऑफ महाराष्ट्र' ची उपाधी मिळाली होती. सन १९५८ ते १९८० पर्यंत ते महाराष्ट्र पोलिस साठी खेळत राहिले,आणि संघाचे कर्णधारपद देखील सांभाळले. १९६२ मध्ये भारताचा रग्बी फुटबॉल संघ श्रीलंका येथे गेला होता. पंढरीनाथ दादा यांनी या संघाचे प्रतिनिधित्व करीत उत्तम खेळ प्रदर्शन केले. 




पंढरीनाथ गोपनारायण हे महाराष्ट्र व अकोला फुटबॉल संघासाठी अभेद्य भिंत होते. एवढे महान खेळाडू असून देखील कधी घमण्ड करीत नव्हते. अतिशय सरळ,शिष्स्तप्रिय आणि प्रेमळ स्वभावाचे ते मालक होते. महाराष्ट्र फुटबॉल विश्वासाठी नेहमीच  प्रेरणादायी आणि मार्गदर्शक राहिले. ज्युनिअर खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत होते. यासाठी मुलांची फाजील स्तुती न करता कडक शब्दात स्पष्ट बोलायचे. मुलांनी खेळताना कुठे चूक केली आणि पुढे कसे खेळायचे याबद्दल मार्गदर्शन करायचे. अकोला  फुटबॉलला यशो शिखरावर  पोहचविण्यात पंढरीनाथ  गोपनारायण यांचे फार मोठे योगदान राहिले. अकोला फुटबॉलचा सुवर्णकाळ ज्या महारथीनी लिहला, त्यातील एक नाव पंढरीनाथ गोपनारायण यांचे आहे. अकोला फुटबॉल या महान फुटबॉलपटूला कधीच विसरु शकत नाही. पंढरीनाथ गोपनारायण (दादा) यांच्यावर आज सायंकाळी ५ वाजता गुलजारपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.






टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा