Corona: Akola: फिरत्या केंद्राद्वारे २९ ठिकाणी होताहेत स्वॅब संकलन; पालक सचिव यांनी घेतला आढावा




भारतीय अलंकार24

अकोला: कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी  जिल्ह्यात विशेष पथकाद्वारे स्वॅब संकलन करण्यात येत आहे. आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात फिरते स्वॅब संकलन केन्द्रास भेट देवून पाहणी केली. नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर व हात धुणे या नियमाचा पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी फारुख शेख, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.



२९ ठिकाणी होणार चाचणी

रुग्ण संख्या वाढत असलेली २९ ठिकाणे जिल्हा प्रशासनाने निश्चित केली आहेत. अशा सर्व ठिकाणी हे फिरते केंद्र जाऊन लोकांचे घशातील स्त्रावांचे नमुने संकलन करणार आहेत, अशी माहितीही यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिली.



पालकसचिव सौरभ विजय यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला आढावा

जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची व्याप्ति वाढत आहे. या संदर्भात प्रशासन सतर्क असून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दूरदृष्य प्रणालीद्वारे आज पालकसचिव सौरभ विजय यांनी आढावा घेतला.



यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी फारुख शेख,  पोलीस निरीक्षक मोनिका राऊत तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.



यावेळी कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा घेऊन मास्क न वापरण्यावर दंडात्मक कार्यवाही करुन मास्कचा वापर, सामाजिक अंतर व हात धुणे या नियमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिलेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून रॅपिड व आरपीटीएस चाचण्याचे प्रमाण वाढवा. तसेच विलगीकरण करण्यात आलेले रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावे. बाजारात व गर्दीच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कडक कार्यवाही करावी. तसेच कोरोना उपाययोजनाबाबत जनजागृती करण्याचेही सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.



बातमी संदर्भतील व्हिडीओ लिंक

व्हिडीओ: फिरत्या केंद्राद्वारे स्वॅब संकलन; जिल्हाधिकारी पापळकर यांनी केली पाहणी




टिप्पण्या