Akola Crime: हनी ट्रॅप टाकून प्रतिष्ठित नागरिकांना गंडविणारी टोळी गजाआड

                                प्रातिनिधिक चित्र


 


भारतीय अलंकार24

अकोला: गोडी गुलाबीनं ती फोनवर बोलायची...सावज जाळ्यात अडकलं की पैसे उकळायची… असा डाव खेळून अनेक लोकांना गंडविणारी टोळी अकोला पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीने गुन्हा कबूल केला असून, पोलिसांनी त्यांना आता गजाआड केलं आहे.


अकोल्यातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व नोकरी करणाऱ्या नागरिकांवर हनी ट्रॅप टाकून पैसे लुटणाऱ्या टोळीचा खदान व एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना गजाआड केले असून, या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.



घटनेची हकीकत अशी की, अकोला जिल्हा परिषदेमध्ये लिपिक पदावर कार्यरत असलेले तेजराव जगदेव नवलकार यांना २१ जानेवारी रोजी कथित प्रीती थोरात नामक युवतीने फोन करून भेटण्यासाठी बोलविले.  यानंतर नवलकर हे त्या युवतीला भेटण्यासाठी एमआयडीसी परिसरातील अप्पू टी पॉइंट जवळ गेले.



यादरम्यान ती युवती त्याठिकाणी कारमध्ये आली. तेथे नवलकर यांच्या सोबत गप्पा मारू लागली. त्यानंतर काही वेळाने तीन युवक तेथे आले. "आमच्या बहिणीसोबत छेडखानी का केली", असे म्हणून नवलकर यांना मारहाण करू लागले. तसेच हे प्रकरण निपटविण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. सामाजिक बदनामीमुळे तेजराव नवलकर यांनी त्या इसमांना एक लाख रुपये दिले. या बाबतची तक्रार नंतर नवलकर यांनी पोलीस स्टेशनला दिली.



याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भा. दं. वि. कलम १२० ब, १७०, ३८४, ३८५, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल करून तपास सुरू केला. या घटनेत अक्षय चिरांडे हा युवक सहभागी असल्याची माहिती तपास दरम्यान पोलिसांना मिळाली. या युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी केली. अक्षय चिरांडे याने संतोष यादव, राहुल इंगळे सोबत आपण हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवून चारही आरोपींना गजाआड केले.



सराफा व्यापारी देखील अडकले होते जाळ्यात



याआधी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार वर्मा यांच्या मोबाईलवर देखील एका अज्ञात युवतीने फोन करून, त्यांना भेटण्यास विनंती केली. त्यानंतर वर्मा हे गौरक्षण रोडवर तिला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी युवतीने त्यांना मलकापुरातील एका सदनिकेत नेले. त्या ठिकाणी हेच युवक आले होते. युवतीचा विनयभंग केल्याची आरडाओरड केली. यावरून वर्मा यांच्या सोबत तोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र,वर्मा यांनी या युवकांना भीक घातली नाही. यानंतर वर्मा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या टोळक्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.



अकोल्यात मागील काही वर्षात हनी ट्रॅप घटनेत वाढ झालेली आहे. परंतू समाजात प्रतिष्ठा मलीन होईल,या भीतीपोटी पिडीत पोलिसात  तक्रार करीत नाही. हनी ट्रॅपच्या माध्यमातून प्रतिष्ठीत नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये हे टोळके उकळतात. या टोळ्यांच्या जाळ्यात शहरातील अनेक नामवंत प्रतिष्ठित नागरिक अडकले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पोलिसांनी आता या एका टोळीचा पर्दाफाश केल्याने अनेक नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनोळखी व्यक्ती कडून आलेल्या फोन कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देवू नये. संशय आल्यास पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


टिप्पण्या