Sunday story: अकोला: सायकल वारी: महसूल आणि पोलीस अधिकारी स्वकृतीतून देताहेत स्वस्थ राहण्याचा मंत्र…

Sunday story: Akola: Cycle Wari: Revenue and police officers are giving the mantra of staying healthy 




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी सायकल चालविणे हा व्यायाम स्वस्त आणि मस्त आहे. कामाच्या व्यापात हल्ली सायकल चालविणे टाळल्या जाते. परंतू, आठवड्या भराचा ताणतणाव घालविण्यासाठी सायकल चालविली तर हे सहज शक्य आहे, हा विचार घेवूनच अकोल्यातील दोन शासकीय अधिकाऱ्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली.अकोल्यात चार महिन्यांपासून दर रविवारी सुरू झालेली ही 'रविवारची सायकल वारी' आता व्यापक झाली आहे.


अकोल्यातील या सायकल वारीला 'अकोला सायकल ग्रुप' असे आपसूक नाव पडले. दर रविवारी शहराच्या आसपास २५ ते ३० किलोमीटर सायकल चालवून त्या ठिकाणाहून दुपारपर्यंत परतीचा क्रम ठरला. दर रविवारी, वेगवेगळी थीम आणि ऊर्जा घेऊन शहराच्या ३० किमीपर्यंत जाऊन हे सायकल स्वार आठवड्यातील थकवा दूर करतात. शरीराला व्यायाम मिळावा आणि पर्यावरण संतुलनातं आपला सहभाग असावा, या उद्देशाने अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आणि शहर पोलिस अधीक्षक सचिन कदम यांनी दर रविवारी सायकल चालवण्याचा उपक्रम सुरू केला. 


गप्पा गोष्टी... संगीत  


दर रविवारी, हा सायकल ग्रुप पहाटे सहा वाजता एकत्र येतो. आज पहाटे देखील निर्धारित ठिकाणी सर्व सायकलने एकत्र आले. अकोला शहर ते ग्राम दोनद असा मार्ग ठरवून, सायकल वारीला सुरुवात केली. सुरक्षितरित्या आणि संयमाने सायकल चालवून सायकलस्वार अवघ्या २ तासांमध्ये निर्धारित ठिकाणी पोहोचले. विशेष म्हणजे, चार महिन्यांपासून या अकोला सायकल ग्रुपमध्ये युवकांचा  सहभाग वाढला. याशिवाय महसूल  आणि पोलिस विभागातील कर्मचारी सुध्दा या उपक्रमात स्वेच्छेने सहभागी होत आहेत.  दरम्यान, ही सायकल वारी निर्धारित ठिकाणी पोहोचल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात आठवडाभराच्या गप्पा - गोष्टी सोबत नाश्ताचा आस्वाद घेतला जातो. आणि या तणावमुक्त क्षणांच्या वेळी संगीतचा आनंद घेत सर्व शीण उतरवून नवी ऊर्जा घेऊन परतीच्या मार्गाला लागतात.

महसुल आणि पोलीस हे दोन असे विभाग आहे की, यातील प्रत्येक घटकाला दिवस रात्र जागरूक राहावे लागते. वर्षभर कामाचा ताण. यावर्षी तर कोरोना विषाणू महामारी कालावधीत हा ताण अधिकच होता. अशा परिस्थितीत शासकीय अधिकाऱ्यांनी स्वस्थ शरीर आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद म्हणावा लागेल...



सायकल चालविण्याचे फायदे

*सायकल ही कधीही आणि कुठेही चालवता येते. या सोप्या व्यायामासाठी जास्त खर्चही येत नाही.


*सर्व खेळाडूंसाठी हा उत्तम व्यायाम प्रकार आहे. शरीराला दुखापत कमी होते.


*सायकल हा एरोबिक्स व्यायाम प्रकार आहे. ज्यामध्ये कमीत कमी ताण पडतो व दुखापत कमी होते. 


*मांसपेशींना आकार प्राप्त होतो.शरीराचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.


*पचनक्रिया सुधारते. चरबीचे प्रमाण कमी होते. 


*सायकल घेणे आर्थिक दृष्टया सर्वांना परवडणारी असून,इंधनाची बचत होवून वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास हातभार लागतो.




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा