Road accident: भरघाव वाहनाने लग्न वरातीत नाचणाऱ्यांना उडविले;२ ठार,२ गंभीर

                              प्रातिनिधिक चित्र


भारतीय अलंकार

अकोला: नवरदेवाची वरात मंदिरात जाताना समोर नाचणाऱ्या व-हाड्यांना भरधाव वाहनाने उडवल्याने एकाचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्याचा उपचारा दरम्यान  मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान टेंभूर्णा येथे घडली. अपघातात दोन गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी वाहनचालक पसार झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी वाहनाची तोडफोड केली.


अकोला जिल्ह्यातील सावरगाव येथील ज्ञानेश्वर वासुदेव पायघन यांच्या लग्नासाठी रविवारी सकाळी वरात निघाली होती. गावातील काशिराम काळसे यांच्या मुलीसोबत लग्न ठरले होते. दरम्यान, नवरदेवासह व-हाडी दर्शनासाठी मेहकर रोडवरील मारोतीच्या मंदिरात जात होते. यावेळी ३० ते ४० व-हाडी रस्त्यावर उपस्थित असताना शिर्ला नेमाने येथील वाहनचालक दत्तात्रय गोविंदराव पाचपोर याने प्रवाशी वाहन क्रमांक एमएच-२८ व्ही-३०४३ भरधाव चालवून व-हाड्यांच्या अंगावर धडकावली. 




यामध्ये चान्नी येथील गजानन किसन टाले  (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल शामराव वाट (वय २२) याचा उपचार दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. सोपान हिरळकर (वय १८) रा.चान्नी, आनंद दत्तात्रय बोराडे (वय ११)  अमोलवार (वय २१) व इतर जखमी झाले आहेत. जखमींवर खामगाव येथे उपचार सुरू आहेत. 



घटनास्थळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत वाहनचालक वाहन टाकून पसार झाला. नेमका त्याचवेळी जमावाने दुसराच व्यक्ती चालक असल्याचे समजून त्याला बेदम मारहाण केली. यावेळी गावात प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता.सखाराम पुंजाजी पायघन यांच्या तक्रारीवरुन चालक दत्तात्रय पाचपोर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या