convocation-ceremony-pdkv-: नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदलाचे दायित्व कृषी पदवीधरांवर- डाॅ. के.बी. कथिरिया
ठळक मुद्दे
कृषी विद्यापीठाने विविधांगी पैलू पाडलेले 2936 स्नातक राष्ट्रसेवेची जबाबदारी समर्थपणे पेलण्यास सज्ज!
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ४० वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न!
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जागतिक पातळीवर भारत देश महासत्ता बनण्याकडे दमदार वाटचाल करीत असतांना कृषीप्रधान संस्कृती व सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्राची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायाने कृषी पदवीधरांवर अधिक उत्तरदायित्व असल्याचे प्रतिपादन डाॅ. के. बी. कथिरिया, कुलगुरू, आनंद कृषी विद्यापीठ, आनंद गुजरात यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ४० व्या दीक्षांत समारोहात कृषी विद्यापीठाचे दीक्षांत सभागृहामध्ये पदविकांक्षीच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत संपन्न झालेल्या या दिमाखदार आणि शिस्तबद्ध कार्यक्रमाचे प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पदविकांक्षींसमोर दीक्षांत भाषण करताना त्यांनी उपस्थित पदविकांक्षींना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या अतिशय प्रेरणादायी संबोधनात त्यांनी देशातील कृषी क्षेत्राची सद्यःस्थितीआणि कृषी क्षेत्राचे भवितव्यावर सखोल प्रकाश टाकून शाश्वत स्वरुपाच्या ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठांची भुमिका मध्यवर्ती ठरते असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने येथील शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव काम केलेले दिसते. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न दुप्पट करण्याच्या संकल्पनेचे अनुसरण करून या विद्यापीठाचे कार्य देशातील इतर भागात अनुकरण केले पाहिजे, जिथे समान कृषी-हवामान परिस्थिती आहे. या विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या एकूण अकरा गावांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी चार कलमी कार्यक्रम राबविला आहे, ज्यात प्रामुख्याने -आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पादन दुप्पट करणे, उत्पादन खर्च ५० टक्क्यांनी कमी करणे, यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करणे आणि उत्पादन ते बाजारपेठेपर्यंत मूल्य साखळी विकसित करून आणि एकात्मिक शेती प्रणालीचा अवलंब करून पिकांचे मूल्यवर्धन करणे आदींचा समावेश आहे.
विद्यापीठाची आदर्श गाव संकल्पना ही शाश्वत विकासाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली आहे आणि त्यांचे राहणीमान उंचावले आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमांतर्गत, शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय काम करण्यास प्रेरित केले जाते. या कामात, शेतीशी संलग्न सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये समन्वयक म्हणून विद्यापीठांतर्गत काम करणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका खूप महत्त्वाची बनत आहे.
कृषी विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी वातावरणीय बदलाच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन केले. दीक्षान्त सोहळ्यात पदवी घेतलेल्यांचे काम आता संपलेले नसून खऱ्या अर्थाने येथून पुढे सुरु झाले असून शेतकरी, समाज व देशासाठी काम करावे असे भावपूर्ण आवाहन केले.
कृषी विद्यापीठाचे दीक्षांत सभागृहात पदविकांक्षीच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत संपन्न झालेल्या या दिमाखदार आणि शिस्तबद्ध कार्यक्रमाचे प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पदविकांक्षींसमोर दीक्षांत भाषण करताना त्यांनी भविष्यातील जागतिक स्पर्धेचे गणितच विद्यार्थ्यांना उलगडून सांगितले. भारतीय कृषी शिक्षण, भारतीय अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राचे महत्त्व, भारतीय संस्कृती आणि कृषी क्षेत्र, कृषी तंत्रज्ञान, राज्यातील कृषी क्षेत्रांची सद्यस्थिती, ॲग्री स्टार्टअप, व अंतर्गत उपलब्ध असलेल्या संधी आदींवर अतिशय विस्ताराने बोलताना डॉ. कथिरिया यांनी उपस्थित युवा वर्गाला उज्वल भविष्य विषयी अवगत केले. तसेच त्यांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सुरु असलेल्या उपक्रमांचे, आजवर केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. या विद्यापीठाने विविध पीकवाण, यंत्र तंत्रांचा शोध लावत शेतकऱ्यांना फायदेशीर तंत्रज्ञान विकसित करून कालानुरूप विकास साध्य करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख करून विद्यापीठ उच्चतम योगदान देत असल्याचे सांगितले. शिकणे ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे. पदवी हा शिक्षणाच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे. निर्माण झालेली आव्हाने सुधारण्यासाठी, उत्कृष्टतेसाठी संधी देतात. यातील यशाचे रहस्य कठोर परिश्रमात आहे. व्यावहारिक जीवनात ज्ञानाचा वापर खऱ्या पदविधराचे प्रतीक मानले पाहिजे. त्यामुळे या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा, असेही आवाहन केले.
कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण व अहवाल वाचन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. याप्रसंगी आनंद कृषी विद्यापीठ, आनंद गुजरातचे कुलगुरू डॉ. के.बी.कथिरिया, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य ऍड. किरण सरनाईक, राम ठाकरे, शिवराम घोडके, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. गोविंदराव भराड, डॉ. विलास भाले, डॉ. सुभाष पुरी सोबतच विद्या परिषदेचे सन्माननीय सदस्य आणि डॉ.सतिश ठाकरे, कुलसचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.
आज संपन्न झालेल्या दीक्षांत समारंभात एकूण 2936 स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात आल्यात.यामध्ये बी.एस्सी (कृषि) 1986, उद्यान विद्या 198, वन विद्या 45, कृषि जैव तंत्रज्ञान 86, कृषि व्यवसाय व्यवस्थापन 66, बी. टेक. अन्नशास्त्र 53, बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) 71 अशा एकूण 2505 तर पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखेमध्ये एम.एस्सी (कृषि) 267, उद्यान विद्या 36, वनविद्या 09, कृषि अभियांत्रिकी 14, एम. बी. ए (कृषि) 57 अशा एकूण 383 तर पीएच.डी. 48 आदींचा समावेश आहे. उपरोक्त 2936 स्नातकांपैकी दीक्षांत समारंभात 41 आचार्य पदविधारक, 314 स्नातकोत्तर, 1770 पदवीपूर्व पदवीकांक्षीनी व्यक्तीश: उपस्थित राहून पदव्या स्वीकारल्यात तर उर्वरित 811 स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थीना संबंधित महाविद्यालयाच्या स्तरावर अप्रत्यक्षरीत्या पदव्या प्रदान करण्यात आल्यात.
कृषि पदवी अभ्यासक्रमातुन सदाशिंव गोपाळ उंबरकर, कृषि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमातुन कु.स्वप्ना सुभाषराव जामनिक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातुन दिपा राणी एन. यांनी यंदा मुले तथा मुलींमधून सर्वाधिक पदकांची कमाई केली आहे.
यासह एकूण 16 विद्यार्थ्यांनी सुवर्ण, 12 रौप्य, 14 रोख बक्षिसे व 01 पुस्तकं स्वरूपात बक्षिसे व पदके प्राप्त करीत इतर विद्यार्थ्याना प्रेरित केले आहे. तर 1 उत्कृष्ट शिक्षक, 11 उत्कृष्ट संशोधक, 2 उत्कृष्ट कर्मचारी व 1 उत्कृष्ट संशोधन परितोषिक यांचा समावेश आहे, अश्या प्रकारे एकूण 43 विद्यार्थी व अधिकारी यांनी 48 पदके व रोख पारितोषीके प्राप्त करीत विद्यापीठ व आपले विभागाला लौकिक प्राप्त करून दिला आहे.
आज सकाळी ठीक 10 वाजता सुरु झालेल्या या भव्य दिव्य दिक्षांत समारोहात निमंत्रित मान्यवर व पदवीकांक्षी विद्यार्थी -विद्यार्थींनी व पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी, वाद्य वृंद पथकाद्वारे मान्यवरांचे दीक्षांत मिरवणुकी द्वारे कार्यक्रम स्थळी आगमन होताच राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर कुलसचिव डॉ.एस.के ठाकरे यांनी कुलगुरूंना दीक्षांत समारंभ सुरू करीत असल्याचे घोषित करण्यासंबंधी निवेदन केले. कुलगुरूंच्या मान्यतेने दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली.
सुरूवातीला विद्यापीठ गीत व सरस्वती वंदना झाली. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या स्वागतपर प्रास्ताविक भाषणानंतर पदवीदान समारंभाला प्रारंभ झाला. विविध गुणवत्ताधारक, पारितोषिकासाठी निवड झालेल्या पदविकांक्षींना त्यांची पदके व पारितोषिके मान्यवरांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आलीत. याप्रसंगी सर्व नवपदवीकांक्षीना कुलगुरूनी दीक्षांत उपदेश दिला. त्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
समारोपीय सत्राचे शेवटी राष्ट्रगीता नंतर कुलगुरूंनी दीक्षांत समारंभ संपन्न झाल्याचे घोषित केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा