Dr. Salampuriya: डॉ नंदकिशोर सलामपुरीया अनंतात विलीन; कोरोनामुळे घेतली अकाली एक्झिट: शहरात शोककळा




भारतीय अलंकार

अकोला: विदर्भातील प्रख्यात प्लास्टीक सर्जन डॉ. नंदकिशोर सलामपुरीया यांचे आज मंगळवार १२ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास उपचार सुरु असतांना निधन झाले. 



डॉ. सलामपुरीया यांच्या निधनाच्या वृत्ताने  शहरातील वैद्यकीय क्षेत्रासोबतच अग्रवाल व मारवाडी समाजात शोककळा पसरली. डॉ. सलामपुरीया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने, त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. कोरोना पॉझिटीव्ह निघाल्यामुळे येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये भरती झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवू लागली.


परंतु ४-५ दिवसांपूर्वी पुन्हा प्रकृती ढासळू लागली. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने उपचारामध्ये प्रतिसाद मिळू शकला नाही. अखेर आज १२ जानेवारी रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी डॉ. शारदा सलामपुरीया आणि दोन मुली असून डॉ. के.के. अग्रवाल यांचे ते बहिण जावाई होते. कोरोना दिशा निर्देशानुसार त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.



बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथील मुळचे रहिवासी असलेले डॉ. सलामपुरीया यांनी अकोला जिल्ह्याला आपली कर्मभूमि करीत या ठिकाणी प्लास्टीक सर्जरी आणि जळीत रुग्णांच्या सेवेतून वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. श्रीराम हॉस्पिटल हे अकोलाच नव्हे तर पश्चिम विदर्भात जळीत रुग्णांवरील उपचारासाठी नावलौकीक असून डॉ.सलामपुरीया यांचा सालस स्वभाव आणि रुग्णांवर योग्य उपचार यामुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे वेगळेच स्थान होते.


टिप्पण्या