Akola Police: फटाके फोडणाऱ्या बुलेटराजा विरुद्धची मोहीम आणखी कडक; आता सरळ बुलेट जप्तीची मोहीम



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: मागील काही दिवसांपासून शहर वाहतूक शाखा अकोला शहरातील फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्ध धडक मोहीम राबवित आहे. या अंतर्गत बुलेटच्या मूळ सायलेन्सर मध्ये बदल करून फटाके फोडणारे सायलेन्सर लावणाऱ्या 'बुलेट राजांना' चाप लागण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत २५ बुलेट वाहतूक शाखेत लावून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अश्या बुलेटचे सायलेन्सर बदलून घेऊन परत मूळ सायलेन्सर लावून मगच अश्या बुलेट सोडण्यात येत आहेत.




नागरिकांच्या तक्रारी

मोहिमेचा काही अंशी फरक पडला, परंतू शहरात अजूनही बरेच तरुण एक क्रेझ म्हणून अश्या फटाके फोडणाऱ्या बुलेट सुसाट वेगाने चालवित असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे निर्देशा प्रमाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सायलेन्सर बदलून फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्धची मोहीम आणखी कडक केली. 


सरळ जप्तीची कारवाई

आता अश्या बुलेट आढळून आल्यास त्यांचेवर सरळ जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. तर अश्या बुलेट वाहतूक कार्यालयात लावण्यात येणार आहे. त्यांचा अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठवून त्यांची कारवाई झाल्या नंतरच त्यांचे निर्देशानुसार अश्या बुलेट गाड्या सोडण्यात येणार आहेत. यासाठी अकोला शहरात अश्या सायलेन्सर बदलून बुलेट चालविणाऱ्या तरुणांनी याची नोंद घ्यावी. अन्यथा बुलेट जप्तीची कारवाईस तयार रहावे, असा कडक इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिला आहे.


टिप्पण्या