Akola crime: राजकीय किनार नाही: ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी धामधुमीचा फायदा घेत भावाने केला भावावर चाकू हल्ला; आरोपी ताब्यात, जखमी रुग्णालयात



Akola crime: No political edge: Knife attack on brother by brother taking advantage of Gram Panchayat election counting fuss;  Accused in custody, injured in hospital




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुक मतमोजणीची धामधूम होती. अकोल्यातही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मतमोजणी सुरू होती.निकाल ऐकण्याची उत्सुकता असल्यामुळे उमेदवारासह त्यांच्या पाठीराख्यानीही कलेक्टर ऑफिस चौकात गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत, घुसर गावातील रहिवासी असलेल्या दोन सख्या चुलत भावात पूर्ववैमनस्यातून वाद उफाळून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. सुरवातीला या घटनेला राजकीय किनार असल्याचे बोलल्या गेले. मात्र,आरोपीच्या अटकेनंतर हा वाद भावकीतला असल्याचे समोर आले. परंतू, या हल्ल्यामुळे सकाळी शहरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.




सकाळी मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. निकाल काय हाती येणार याकडे येथे उपस्थित असलेले उमेदवार आणि विविध राजकीय पक्ष कार्यकर्त्याचे लक्ष लागले होते. सर्व वातावरण राजकीय रंगात रंगले असताना, अचानक परिसरात पळापळ सुरू झाली. जिल्ह्याधिकारी कार्यालय ते अशोक वाटिका दरम्यान एकच कल्लोळ झाला. दोन सख्या चुलत भावांमध्ये आपसी वाद होवून चाकू हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मतमोजणी सुरू असल्याने या ठिकाणी पोलीस कर्तव्यावर तैनात होतेच. पळापळ सुरू असतानाच पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. याच दरम्यान या घटनेमुळे तहसिल कार्यालय जवळ राजकीय वादातून एकाची हत्या झाली, अशी अफवा देखील शहरात पसरली होती.


आरोपी तात्काळ ताब्यात


निवडणूक मतमोजणी सुरू असताना सकाळी  दहाच्या सुमारास अकोला पंचायत समिती कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असतांना दोन चुलत भावंडात बाचाबाची व वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, हाणामारी सुरू झाली. यातील पीडित ने सर्वोपचार रुग्णालय दिशेने धाव घेतली. या दरम्यान आरोपीने पीडितवर चाकूने पोटात वार केले. पीडितने काही वार चुकवित स्वतःचा जीव वाचविला. येथे तैनात असलेले पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव, पोलीस कर्मचारी आकाश मानकर यांनी आरोपी सुरेश पांडुरंग गोपनारायण याला हल्ल्यात वापरलेल्या चाकूसह ताब्यात घेवून सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले. तर यातील जखमी दीपक गोपनारायण याला पोलिसांनी तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. 


दहा वर्षापूर्वी देखील वाद

                                 जखमी दीपक 


आरोपी सुरेश आणि पीडित दीपक गोपनारायण यांच्या दहा वर्षांपूर्वी देखील वाद झाला होता. तसेच वर्ष भरापूर्वी सुध्दा यांच्यात वाद झाला होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी आज गर्दीचा फायदा घेत आरोपीने पीडितवर हल्ला केला.मात्र, याच गर्दीचा फायदा होऊन पीडित या हल्ल्यातून थोडक्यात वाचला. पीडितवर उपचार सुरु असून,आरोपीची चौकशी करून त्याच्या विरुद्ध विविध कलमान्वये त्याच्यावर सिटी कोतवाली पो.स्टे. येथे गुन्हे दाखल करण्यात आले. हा चाकू हल्ला दोन भावातील आपसी जुन्या वादातून झाला असून, या घटनेचा राजकारण, निवडणूक याच्याशी काहीही संबंध नाही,असे पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. 


टिप्पण्या