Youth congress: शेतकरी समर्थनार्थ युवक काँग्रेस मैदानात; संजय धोत्रे यांच्या घराला घातला घेराव



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : केंद्र सरकारने पारित केलेल्या किसान बिलच्या विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने 'जबाब दो' आंदोलन करीत आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या घराला घेराव घालून शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी केंद्र सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली. एका पदाधिकऱ्याने मुंडन करून आपला रोष व्यक्त केला. यावेळी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत असतांना पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला.



मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात दिल्लीत शेतकरी उद्रेक व्यक्त करत आहेत. दोन महिन्यांपासून पंजाब, हरीयाणासह अन्य राज्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली' अशी हाक देत दिल्लीची सीमा गाठली आहे. अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.  सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चा होत आहेत. मात्र,तोडगा निघत नाही आहे. मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हंटले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला  राजकीय पक्षांचे पाठबळ देखील मिळाले आहे.




जवाब दो... जवाब दो.. संजय धोत्रे जवाब दो… घोषणांनी परिसर दणाणले



देशभरातील शेतकरी पेटलेला असताना, भाजपचे खासदार, मंत्री, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? याचा जाब विचारण्यासाठी युवक काँग्रेसने आंदोलन केले. अकोल्यात ना. संजय धोत्रे यांच्या घरावर आज "जवाब दो" आंदोलन करीत "जवाब दो… जवाब दो… संजय धोत्रे जवाब दो…", अश्या घोषणा देत युवक काँग्रेसने परिसर दणाणून सोडला. 


जिल्हाध्यक्ष महेश गणगणे व शहरध्यक्ष अंशुमन देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले गेले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आदेशानुसार राज्यभरात भाजप खासदार व केंद्रीय मंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करून आपण शेतकऱ्यांविषयी का बोलत नाही? अशी विचारणा करण्यात येत असल्याची माहीती प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी दिली.



यावेळी संजय धोत्रे यांच्या कडून अधीकृत उत्तर मिळाले नाही. त्यामुळे जो पर्यंत आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तो पर्यंत आम्ही येथुन हलणार नाही, असा पवित्रा घेऊन युवक काँग्रेस कार्यकर्ते अधीक आक्रमक झाले. यावेळी पोलीसांनी युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.



आंदोलनात प्रदेश महासचिव विजयसिंग राजपुत, सागर कावरे, सागर देशमुख, राहुल येवले, प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, प्रदेश सचिव ऍड. विवेक गावंडे, राम डहाके, श्रेयस इंगोले, अमरावती जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे, वाशिमचे बाबुराव शिंदे, यवतमाळचे अतुल राऊत,आकाश कवडे, अंकुश पाटील, मिलींद झामरे, नितीन चिंचोळकर, आकाश सिरसाट, अक्षय इनामदार, निलेश चतरकर, मो.शोएब , स्वप्निल मोरे, गजानन आसोलकर, अंकुश गावंडे ,अक्षय गणोरकर,अंकुश भेंडेकर, वीर काकड यांनी सक्रिय सहभाग घेतला.





टिप्पण्या