Warkari aandolan: वारकऱ्यांचे आंदोलन झाले तीव्र; राज्यातील वारकरी दिंड्या घेवून उद्या पोहचणार अकोल्यात- शेटे महाराज

पंढरपूरचे वारकरी असणाऱ्या सर्वपक्षीय राजकीय नेते वारकरी म्हणून आंदोलनामध्ये सहभागी होतील




भारतीय अलंकार

अकोला: किमान शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला नियम व अटी लागू करून रितसर परवानगी देण्यात यावी, या मागणी करिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालया समोर विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी २ डिसेंबर पासून उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी यांनी काल आणि आज आंदोलकांसोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी शेटे महाराजांसह उपस्थित वारकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतू चर्चेत तोडगा निघाला नाही. मात्र, आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आता आंदोलन तीव्र करणार असून, येत्या ९ डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास १ लाख वारकरी अकोल्यात दिंड्या घेऊन येणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. आज यासंदर्भात शेटे महाराजांनी पत्रकार परिषद घेवून, उद्या होणाऱ्या दिंडी भजन आंदोलनाची रूपरेषा सांगितली.



चर्चेत तोडगा निघाला नाही

काल सोमवारी संध्याकाळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व तत्काळ धार्मिक कार्यक्रमाला १०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देणारे पत्र देण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी हा मुद्दा राज्यस्तरीय असल्याने वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री यांच्याशी संपर्क करून निर्णय देतो, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे उपोषणकर्ते आणि वारकऱ्यांचे समाधान न झाल्याने उपोषण अखंडितपणे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.



उद्या ९ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन: उपोषणकर्ते  गणेश महाराज शेटे यांची पत्रकार परिषदेत माहिती 



वारकऱ्यांच्या वतीने सरकारला शंभर भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमाकरिता परवानगी देण्यात यावी याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालया समोर आठ दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आणि महाराष्ट्रातील  संत मंडळी दररोज मोठ्या संख्येने उपोषणाला भेट देण्याकरता येत आहेत. यामध्ये गुलाबराव गावंडे, राम गव्हाणकर  यांनी भेट दिली. पण काल आणि आज सुध्दा  जिल्हाधिकारी पापळकर  यांनी स्पष्ट सांगितले की, भजन-कीर्तन वरील बंदी सरकारने अजून कायम ठेवलेली आहे. म्हणून रीतसर आपल्याला परवानगी देता येणार नाही. 




पण वारकरी अट्टाहास पेटलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि म्हणून सर्व वारकरी संघटना एकरूप झालेले असून, वारकरी संप्रदायाची ताकद सरकारला दाखवण्याच्या उद्देशाने ९ डिसेंबरला दुपारी बारा वाजता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने भव्य भजन आंदोलनाचे आयोजन केले असल्याची माहिती आंदोलक शेटे महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 



विदर्भाच्या बाहेरील भाविकही होणार सहभागी

विदर्भाच्या बाहेरील भाविक आणि  विदर्भातील सर्व जिल्ह्यातील माळकरी  आपल्या गावातील दिंडी सोहळा, पुरुष भजनी मंडळ ,महिला भजनी मंडळ, धार्मिक संघटना, सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, महिला बचत गट या सर्व मंडळीं  टाळ, मृदुंग, विणा वादक ,चोपदार आपले विशिष्ट वारकरी पोशाख परिधान करून येतील. सर्व माळकरी मंडळीं, वारकरी, पोषाखा मध्ये भजन आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतील  भजन आंदोलनामध्ये  सर्व राजकीय नेते  हे वारकरी पोषाखामध्येच सहभागी होणार आहेत. पंढरपूरचे वारकरी असणाऱ्या सर्वपक्षीय राजकीय नेते वारकरी म्हणून आंदोलनामध्ये सहभागी होतील, असे देखील महाराजांनी सांगितले.


हे होते उपस्थित

यावेळी गणेश महाराज शेटे यांच्यासह महादेव महाराज निमकांडे, विठ्ठल महाराज  साबळे, राजू महाराज कोकाटे, ज्ञानेश्वर महाराज जावरकार, ज्ञानेश्वर महाराज नावकार, गणेश महाराज जायभाये , ज्ञानेश्वर महाराज पातोंड, श्रीधर महाराज  तळोकार, विजय महाराज शेटे, सोपान महाराज उकर्डे, बाभूळकर महाराज, गणेशराव कळस्कार, गजानन मोडक, संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव चे कार्याध्यक्ष विजय ढोरे, प्रशांत आकोते , वामनराव कवडे (प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र धोबी परीट महासंघ) आदींची उपस्थिती होती.



जिल्हाधिकारी यांनी शासनाला पाठविले पत्र 


जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी संध्याकाळी शासनला पत्र पाठवून उपोषणाची माहिती दिली. उपोषणकर्त्यांची मागणी लक्षात घेता शासनाने या संदभार्त तोडगा काढण्यासाठी निर्णय घ्यावा, असे एका पत्राद्वारे सूचित केले आहे. तसेच वारकऱ्यांनी दिलेल्या चेतावणीनूसार १ लाखावर वारकरी अकोल्यात दाखल झाले तर कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही पत्रात नमूद केले आहे.



टिप्पण्या

  1. वारकरी

    वारकरी संप्रदाय भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. आजतरी भारतीय जनपतीला संस्काराची नितांत गरज आहे.
    शासनाचे याबाबत बेरजेचा विचार शीघ्रतेने करावा.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा