vegetable traders: घाऊक भाजीपाला व्यवसायिकांचा मनपा प्रशासन विरोधात एल्गार; नववर्षाच्या प्रारंभी साखळी उपोषणास आरंभ

Elgar against the municipal administration of wholesale vegetable traders; Begin the chain fast at the beginning of the new year (photo:nilima)





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोरोना विषाणूची सबब पुढे करीत अकोला महानगरपालिका प्रशासनाने घाऊक भाजीपाला व्यावसायिकांना जनता भाजी बाजारात हर्रासी करण्यापासून रोखले होते. यावर पर्याय म्हणून या व्यावसायिकांनी लोणी रस्त्यावरील सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्यबाजारात स्थानांतरित होणे पसंत केले. मात्र, मनपा प्रशासनाचा वरदहस्त प्राप्त असलेला याच व्यवसायिकांचा दुसरा एक गट आज रोजी मनपाचे नियम व निकष धाब्यावर बसवित जनता भाजी बाजारात खुलेआम हर्रासी करीत आहेत. यामुळे लोणी मार्गावरील घाऊक व्यावसायिकांवर अन्याय होत आहे. हा प्रकार जिल्हा प्रशासन व मनपाने बंद न केल्यास १ जानेवारी पासून साखळी उपोषणाला सुरुवात करणार असल्याची माहिती गुरुवारी लोणी मार्गावरील घाऊक व्यवसायिकांनी पत्रकार परिषदेत दिली.


मनपा प्रशासनाला जनता भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुल बांधायचे असा आरोप देखील घाऊक व्यवसायिकांनी यावेळी केला.


लोणी मार्गावरील बाजारात सुमारे २२० पेक्षा अधिक घाऊक व्यावसायिकांनी एकत्र येत जमिनीची खरेदी करून बाजारासाठी गाळे बांधले आहेत. सुरवातीला येथे ग्राहकी होती. मात्र, काही दिवसांपासून जनता भाजी बाजारात मनपाचा वरदहस्त प्राप्त असलेल्या काही व्यावसायिकांनी भाजीपाला हर्रासी पुन्हा सुरु केल्यामुळे ग्राहक परत जनता बाजारात जात आहेत.लोणी मार्ग बाजारात प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. शहराच्या बाहेर आहे आदी कारणांमुळे ग्राहक इकडे फिरकत नाहीत. यामुळे लोणी मार्गावरील गाळेधारक, अडते, व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. याचा परिणाम कास्तकार, किरकोळ विक्रेत्यांवरही झाला असल्याचे यावेळी व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला जनता भाजी बाजारात पूर्ववत जागेवर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी,अन्यथा कुटुंबीयांसहीत साखळी उपोषण सुरु करणार आहे.यावरही मनपा प्रशासनाने ठोस निर्णय न दिल्यास कायदेशीर कारवाई करीत, शासनाचा दरवाजा ठोठावणार,असे घाऊक भाजीपाला व्यवसायिकांनी स्पष्ट केले. 


पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष राजेश डाहे, कोषाध्यक्ष प्रशांत चिंचोलकार, संचालकगण संतोष अंबरते, अनंत चिंचोलकर, गणेश घोसे, अनिल गोलाईत, शिवा पल्हाडे, राजेश ढोले, अमोल गोलाईत, योगेश चापके, संजय कोकाटे, गजानन कातखेडे, राजेश ढोमने, सुलभा अंबरते, नंदा गोलाईत समवेत सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजार भाजीपाला घाऊक व्यावसायिक, अडते व गाळेधारक आदी उपस्थित होते.


टिप्पण्या