Uddhav Thackeray: केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन विकास कामांना गती दिली पाहिजे-उध्दव ठाकरे

For the development of the nation, the Central and State Governments should come together and speed up the development work - Uddhav Thackeray



भारतीय अलंकार

मुंबई: जनतेचे सेवक म्हणून काम करतांना विकास प्रकल्पावरून वाद घालणे योग्य नसल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि राष्ट्र विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन विकास कामांना गती दिली पाहिजे, विकासाचे दूरगामी परिणाम विचारात घेतले पाहिजेत असे स्पष्ट केले. आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विकासाला अवधी लागला तरी चालेल परंतू भावी पिढ्यांच्या भवितव्याचा विचार करून काम केले पाहिजे या भावनेने आपण काम करत आहोत, यात कुठेही आपल्या अहंकाराचा प्रश्न नाही. जनतेच्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही काम आपण करणार नाही तर महाराष्ट्र हिताचेच काम करू असेही ते म्हणाले.


विकासकामांवर लक्ष


मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या आड कुणालाही येऊ देणार नाही असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबईतल्या मेट्रो कामाची पाहणी मी आज करणार आहे. या आधी कोस्टल रोडची पाहणी मी केली होती. राज्यातील विकास कामांवर माझे स्वत:चे लक्ष आहे. कोस्टल रोडचे काम मागील एक दोन वर्षापासून सुरु आहे. या कामाबाबत कोळी बांधवांचे काही आक्षेप होते. ते न्यायालयात गेले होते त्यांना या कामाविषयीची माहिती देऊन, समजून सांगितल्यानंतर आता या सागरी किनारा मार्गाचे काम सुरु झाले आहे.


संकटाचा सामना तरी विकासाला गती


कोरोना संकटाशी निग्रहाने लढा देत असतांना अनेक विकास कामांना वर्षभरात गती दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची, महामार्गावर वन्यजीवांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची आपण स्वत: पाहणी केल्याचे ते म्हणाले. 1 मे 2021 पर्यंत नागपूर - शिर्डी या टप्प्यातील महामार्ग वाहतूकीसाठी खुला करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सिंधुदूर्गचे विमानतळ जानेवारी महिन्यात सुरु होणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या आयुष्याला प्रकाशमान करणाऱ्या कोयना धरणाची ही पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची पाहणी करतांना सर्वात अवघड अशा बोगद्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.


संकटकाळात राज्याची मदत


सरकार  आर्थिकदृष्ट्या अडचणीत  आहे, केंद्र सरकारकडून राज्याची हक्काची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे असे असतांना आत्मविश्वासाने एकेक पाऊल पुढे टाकत राज्य शासनाने अनेक आपत्तीच्या प्रसंगात जनतेला, शेतकऱ्यांना मदत केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोरानाचे संकट, निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भातील पूर स्थिती, राज्यभरात अतिवृष्टीने झालेले नुकसान  या सगळ्या अडचणींचा सामना करत राज्य विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जगभर लॉकडाऊनने विकास प्रक्रिया थंडावली असतांना महाराष्ट्र राज्याने 65 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार औद्योगिक क्षेत्रात केले. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी  महाराष्ट्रात गुंतवणूकीला पसंती दिली. जुलै महिन्यात करण्यात आलेल्या सामंजस्य करारातील 70 टक्के काम पूर्ण झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


नवीन वर्षातही  स्वयंशिस्त पाळा - कोरोनाला दूर ठेवा


राज्यातील प्राचीन मंदिरांचा, तेथील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे राज्य शासनाने ठरवले असल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सर्वधर्मियांनी आपापल्या सण, समारंभात शिस्त पाळल्याने आणि जनतेने स्वयंशिस्तीचे पालन केल्याने आपण कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवू शकलो  आहोत. पण अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही  असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  लस आली तरी पुढचे सहा महिने आपल्याला सावध राहण्याची, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर पाळण्याची गरज आहे. युरोप आणि इंग्लंडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली. नवीन वर्ष समोर आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना हे वर्ष सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जाओ अशा शुभेच्छा आपण एकमेकांना देतो. त्या खऱ्या ठरण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्तीने राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.  राज्यातील 70 ते 75 टक्के लोक बाहेर फिरतांना मास्क वापरतांना दिसतात उरलेले 25 टक्के लोक विनामास्कचेच फिरत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आणि समाजाला धोका होऊ शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावे असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

टिप्पण्या