Pradip Mandale: शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Martyr Pradip Mandale's body was cremated in a state funeral



भारतीय अलंकार

बुलडाणा : जम्मू काश्मिर मधील द्रास भागात लाईन ऑफ मेंटेनन्स करीत असताना हिम वादळामुळे हिमकडा अंगावर कोसळून जिल्ह्यातील पळसखेडा चक्का (तालुका सिंदखेड राजा) येथील जवान प्रदीप साहेबराव मांदळे १५ डिसेंबर रोजी शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव लेह, दिल्ली, मुंबई हवाई मार्गे औरंगाबाद येथे काल १९ डिसेंबर रोजी सायंकाळी आणण्यात आले. औरंगाबाद येथे विमानतळावर लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर आज सकाळी औरंगाबाद येथून रस्ता मार्गे पळसखेड  चक्का  येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले.  शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 



यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.



याप्रसंगी लष्कर, पोलीस यांनी बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवान प्रदीप मांडळे यांना मानवंदना दिली. मानवंदनेसाठी १०० आजी – माजी सैनिक उपस्थित होते. काही वेळासाठी पार्थिव शहीद जवान यांच्या घरी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रेला घरापासून सुरूवात करण्यात आली. संपूर्ण गावात रस्त्या-रस्त्यावर रांगोळी काढण्यात आल्या, तर मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजलीचे बॅनर्स लावण्यात आले. यावेळी संपूर्ण गावात भावनिक वातारवण होते. शहीद जवान प्रदीप मांदळे अमर रहे.. च्या निनादात अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली. अंत्यसंस्कार वेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भावपूर्ण वातावरणात भारत मातेच्या वीर सुपुत्राला साश्रु नयनांनी शेवटचा निरोप देण्यात आला. प्रदीप मांदळे भारतीय लष्कारात १० महार रेजींमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांचा जन्म १ जुलै १९८९ रोजी पळसखेड चक्का येथे झाला. औरंगाबाद येथे सैन्यामध्ये शहीद जवान प्रदीप भरती झाले. त्यानंतर २७ ऑक्टोबर २००९ ला महार रेजीमेंट सागर मध्यप्रदेश येथे एका वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून १० महार रेजीमेंट (सिग्नल प्लाटून) मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली.  जवळपास महार रेजीमेंट मध्ये त्यांची १० वर्ष २ महिने सेवा झाली आहे.


त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा जयदीप व अडीच वर्षाचा मुलगा सार्थक, दोन भाऊ असा परीवार आहे. पार्थिवावर भारतीय लष्कारातील उच्च पदस्थ अधिकारी, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, माजी आमदार राहुल बोंद्रे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसिलदार सुनील सावंत, माजी सैनिक कल्याण अधिकारी  फिरदौस, नगराध्यक्ष सतिष तायडे, माधवराव जाधव, ॲड नाझेर काझी आदींनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. अत्यंत शोकाकूल वातावरणात शहीद जवान प्रदीप मांदळे यांना त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिला. यावेळी वातावरण धीरगंभीर झाले होते.


टिप्पण्या