Political news: महाराष्ट्र:अखेर पार्थ पवारांच्या आमदारकीच्या चर्चेला पूर्णविराम !

          राजकारण:गल्ली ते दिल्ली

                                      file photo



भारतीय अलंकार

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांचे नाव पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेत आले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकारणापासून दूर गेलेले पार्थ पवार आता राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून दिसण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर पार्थ पवार यांना संधी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आल्याची जोरदार चर्चा  सुरू होती. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अशी कोणतीही चर्चा नसल्याचे सांगत चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.




राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर मतदार संघातील आमदार भारत भालके यांचे आजारपणामुळे काही दिवसांपूर्वी निधन झाले. भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाची जागा रिकामी झाली आहे. आता कुणाला संधी मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता या जागेसाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना संधी मिळणार अशी सकाळपासून चर्चा होती.



पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू व कर्मवीर औदुंबर पाटील प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनी केली आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही, तर विकासाचं राजकारण व्हायला पाहिजे. अनेक वर्षांपासून मंगळवेढ्यात ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न, पंढरपूर एमआयडीसी आदी मागण्या प्रलंबित आहेत. त्या पूर्ण न झाल्याने पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी. पार्थ यांना उमेदवारी दिल्यास अनेक वर्षांचे प्रश्न सुटतील, असे म्हणत अमरजित पाटील यांनी पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती. 


राजकारण पासून दूर

                                      file photo

पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तेव्हापासून पार्थ पवार राजकारणापासून दूर गेल्याचे चित्र आहे. केवळ कौटुंबिक सोहळ्यात उपस्थितीचे त्यांचे फोटो समाज माध्यमातून पुढे येत होते. बऱ्याच दिवसानंतर त्यांचे नाव या आमदारकीच्या चर्चेत पुढे आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कडून आता या चर्चेला विराम देण्यात आला आहे. मात्र,या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागते,याबाबत जनतेला उत्सुकता आहे.



टिप्पण्या