Mutant strain: लंडनहून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील अकोला शहरातील आठ पैकी सहा व्यक्ती पॉझिटीव्ह




भारतीय अलंकार

अकोला: कोविड १९ च्या नव्या म्युटंट स्ट्रेन आढळून आला असल्याने जिल्हास्तरावर खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत. अकोला जिल्ह्यात विदेशातून आलेले लोक व त्यांच्या संपर्कातील लोक यांनी स्वतःहून कोविडची चाचणी (RTPCR) करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.



यासंदर्भातील जिल्ह्यातील स्थितीचा आढावा आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.  यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे आदी उपस्थित होते.


जिल्ह्यात १५ जण हे विदेशातून आले 

यावेळी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी माहिती दिली की,  राज्यस्तरीय कक्षातून जिल्ह्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १५ जण हे विदेशातून आले आहेत. त्यातील १२ जणांचा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. तीन जण अद्यापही संपर्कात नाहीत. या १२ जणांची  चाचणी झाली असून त्यातील पाच जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित सात जणांचे अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे आहेत.  


शहरातील आठ व्यक्तिंपैकी सहा व्यक्ती पॉझिटीव्ह

दरम्यान लंडनहून आलेल्या व नागपुर येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अकोला शहरातील आठ व्यक्तिंपैकी सहा व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. उर्वरित दोन निगेटीव्ह आल्या आहेत.  या सर्व जणांवर उपचार सुरु आहेत. अशा सर्व व्यक्तिंच्या संपर्क साखळीचा शोध घेऊन सर्व लोकांच्या चाचण्या कराव्या असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.



ग्रामपंचायत निवडणूक:उमेदवारांनी चाचणी करून घ्यावी


जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर गुरुवार ३० पासून ते ४ जानेवारी पर्यंत  सर्व तहसिलदार कार्यालयांत रॅपिड ॲन्टीजेन चाचणीसाठी  शिबिर लावले जाणार आहेत. तेथेही  उमेदवारांनी व अन्य लोकांनी चाचण्या करुन घ्याव्या,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.



जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या मृत्यूबाबत जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, वयोवृद्ध व सहव्याधी असणाऱ्या लोकांनी लक्षणे जाणवताच, तात्काळ कोविड चाचणी करुन उपचार सुरु करावे.  उपचारासाठी उशीर करु नये,असे देखील पापळकर यांनी सांगितले.

टिप्पण्या