Medical: आय. एम. ए. ने पुकारलेल्या संपात आयुष डॉक्टर सहभागी होणार नाहीत-आशुतोष कुळकर्णी यांची माहिती




भारतीय अलंकार

अकोला: भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारा संबंधी स्पष्टता देणारे राजपत्र  प्रकाशित करण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या राजपत्राला विरोध करण्याकरिता शुक्रवार, ११ डिसेंबर रोजी संपाचे आवाहन केले आहे. मात्र, या संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नसल्याचा एकमुखी निर्णय आयुष कृती समितीने घेतला आहे. शुक्रवारी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीचे सर्वच दवाखाने सुरू राहणार आहेत. या दिवशी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत आयुष डॉक्टर गुलाबी फीत लावून रुग्णसेवा देणार असल्याची माहिती निमा अकोला शाखेचे सल्लागार डॉ. आशुतोष कुळकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.



या राजपत्राचे स्वागत करण्याकरिता NIMA (National Integrated Medical Association) केंद्रीय शाखेने आखलेल्या कार्यक्रमानुसार देशात वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणे, विविध बॅनर्स पोस्टर्स आपल्या दवाखान्यात, हॉस्पिटल्स मध्ये लावणे त्याचबरोबर ११ तारखेला राज्यातील १,५०,००० पेक्षा अधिक आयुष डॉक्टर्स गुलाबी फीत लावून वैद्यकीय सेवा नियमितपणे देतील. त्याचप्रमाणे राजपत्र प्रकाशित केल्याबद्दल केंद्र शासनाचे व भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अभिनंदन करणारे व पाठिंबा देणारे पत्र सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना आयुष कृती समितीकडून देण्यात येईल असा देखील आयुष कृती समितीच्या बैठकीत निर्णय करण्यात आला आहे.



या राजपत्रामुळे गत अनेक वर्षांपासून विहित अभ्यासक्रमानुसार शिक्षणादरम्यान प्राप्त प्रशिक्षणाच्या आधारावर शस्त्रक्रिया करणाऱ्या शल्य व शालाक्यतंत्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या सेवेमधील कायदेशीर अडसर दूर झाला असून शस्त्रक्रिये संबंधीची व्याप्ती अधिक सुस्पष्ट झाली आहे व या राजपत्रामुळे ग्रामीण व शहरांमधील आर्थिक दृष्टीने कमकुवत भागात कायद्याच्या चौकटीत तीन वर्षांचे पदव्युतर शिक्षण घेतल्यानंतर विविध शस्त्रक्रियांच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या पदव्युत्तर डॉक्टरांचा कायदेशीर अधिकार अधिक अधोरेखित झाल आहे. आयुष कृती समितीने या राजपत्राचे स्वागत केले असून त्यास पाठिंबा दिला आहे. या राजपत्रामुळे आयुर्वेदाच्या विकासाला अधिक चालना मिळणार असून आयुर्वेदाला राजाश्रय मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.



हे राजपत्र प्रकाशित झाल्यानंतर आय, एम. ए. सारखी संघटना या बाबतीमध्ये निष्कारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून, या राजपत्रामुळे देशात तुटवडा असलेल्या शल्यचिकित्सकांच्या समस्येवर मात करण्याच्या प्रक्रियेत तसेच ग्रामीण भागात शस्त्रक्रिया सारख्या सेवा उपलब्ध होण्याच्या मार्गात अडसर आहे, असे देखील कुळकर्णी यांनी सांगितले.




शस्त्रक्रियेचे पितामह म्हणून सुश्रुताचार्यांना सर्व चिकित्सा पद्धतीमध्ये ओळखले जाते. सुश्रुताचार्य यांच्याद्वारे वर्णित विविध शस्त्रक्रिया तसेच त्याचे पूर्वकर्म व पश्चातकर्म गत ४० पेक्षा अधिक वर्षापासून शल्य व शालाक्यतंत्रातील पदव्युत्तर शिक्षणामध्ये अंतर्भूत आहेत इतकेच नव्हे तर काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आवश्यक ते बदल स्विकारुन त्या शस्त्रक्रिया देशातील व महाराष्ट्रातील विविध आयुर्वेदीय शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर यशस्वी रीतीने केल्या जातात. 


महाराष्ट्रामध्ये कायद्याने आयुर्वेदाच्या पदवीधरांना मिश्र चिकित्सा पद्धतीचा अधिकार प्राप्त झालेला असून त्यासंदर्भात देखील मागील काळात इंडियन मेडिकल असोसिएशनने या कायद्यास स्थगिती देण्यासंबंधी उच्च न्यायालयात मागणी केली होती. परंतु उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्याकरिता स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील याबाबतीत इंडियन मेडिकल असोसिएशनची याचिका फेटाळली आहे,अशी माहिती कुळकर्णी यांनी यावेळी दिली.  



आवाहन


सर्व आयुर्वेदिक, युनानी,होमीओपॅथी डॉक्टरांनी उद्याच्या संपात सहभागी न होता वैद्यकीय सेवा रुग्ण आणि गरजूना प्रदान करावी,असे आवाहन डॉ.आशुतोष कुळकर्णी, डॉ. किशोर मालोकार, डॉ. आनंद चतुर्वेदी, डॉ. दिनेश राठी, डॉ. शाहिद खान, डॉ. अजहर पांडे, डॉ सुनील बिहाडे, डॉ. साधना कुळकर्णी, डॉ. ज्योती कोकाटे, डॉ. अरविंद गुप्ता,  डॉ. सुनील लुल्ला, डॉ. मंजु तोष्णीवाल, डॉ. स्वाती सांगळे, डॉ.माधुरी सोनी, डॉ. मेघा मालपांडे यांनी आवाहन केले आहे.


टिप्पण्या