JEE EXAM: जेईई परीक्षा आता वर्षातून चार वेळा; १३ भाषांमधून होणार परीक्षा, पालक आणि विद्यार्थ्यांनी केले निर्णयाचे स्वागत


भारतीय अलंकार

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी बुधवारी जेईई (मुख्य) परीक्षा-2021 संबंधी अनेक बाबी जाहीर केल्या. जेईई (मुख्य) परीक्षा-2021 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 2021 अशा चार सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 


जेईई (मुख्य) परीक्षा 2021 चे पहिले सत्र 23–26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अनुषंगाने प्रथमच जेईई (मुख्य) परीक्षा-2021 ही मराठी, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा 13 भाषांमध्ये होणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले.



उमेदवारांना चारही सत्रांमध्ये उपस्थिती दर्शवण्याची आवश्यकता नाही. तथापी, उमेदवार एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये उपस्थित असेल तर  बेस्ट ऑफ 2021 एनटीए (NTA) गुण गुणवत्ता यादी अथवा श्रेणीसाठी गृहीत धरले जातील. प्रश्नपत्रिका एकूण 90 गुणांची असेल, त्यापैकी उमेदवारांना 75 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल.



जेईई (मुख्य) परीक्षा-2021 चे चार सत्रांत आयोजन केल्यामुळे उमेदवारांना एका प्रयत्नात चांगले गुण मिळवता आले नाहीत तर आपले गुण सुधारण्याची चार सत्रांमधून बहुविध संधी मिळेल. जर या विशिष्ट कालावधीत बोर्ड परीक्षा असेल किंवा कोविड-19 परिस्थिती असेल तर उमेदवाराला जेईई (मुख्य) परीक्षा-2021 पुढील महिन्यात देण्याची संधी मिळेल.



ना.संजय धोत्रे यांचे आभार


अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळ २ मध्ये केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री म्हणून नामदार संजय धोत्रे व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अनेक निर्णय घेतले. तसेच या covid-19 काळामध्ये मानव संसाधन मंत्रालयाने अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

 

इंजिनीरिंग संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांचा स्कोर सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेणार आहे. विद्यार्थ्यांना रँकिंग संदर्भात तसेच प्रश्न उत्तरचा पॅटर्न तयार करण्यात आला आहे. प्रश्नपत्रिका नव्वद प्रश्नांची असणार असून, कोणतेही निगेटिव्ह  मार्किंग नसणार आहे.  विद्यार्थ्यांना ऑनलाइन फी १६ डिसेंबर ते १६ जानेवारी पर्यंत चार सत्रची फी एकत्र भरण्याची सवलत देण्यात आली आहे,अशी माहिती ना. धोत्रे यांनी दिली.


अनेक पालक संघटनेने संजय धोत्रे, रमेश पोखरियाल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत केले. या संदर्भात अनेक पालकांनी  नामदार धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.


टिप्पण्या