INTUC morcha: कामगार व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी महाराष्ट्र इंटकचा मंत्रालयावर मोर्चा- जयप्रकाश छाजेड

Maharashtra INTUC's Morcha on Mantralaya to repeal anti-labour and anti-farmer laws




‌‌नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: महाविकास आघाडी सरकारने केंद्राने शेतकरी व कामगार विरोधी केलेले कायदे महाराष्ट्रात लागू होणार नाहीत. यासाठी तात्काळ विधानसभेचे अधिवेशन बोलावून केंद्राच्या निर्णयाला पायबंद घालावा, अशी आग्रहाची मागणी महाराष्ट्र इंटक (Indian National Trade Union Congress ) राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एकमुखाने राज्य शासनाकडे केली असून, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी लवकरच मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली.


सोमवारी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत छाजेड यांनी मोर्चा संदर्भात माहिती दिली.


छाजेड यांनी म्हटले की, केंद्राने कायदे केल्यामुळे राज्यात अनेक उद्योग व्यवसायामध्ये मालकांनी कामगारांना तडकाफडकी काढून टाकण्याचे प्रकार वाढले आहे, याची महाराष्ट्र कामगार मंत्रालयाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. कामगारामध्ये केंद्राने केलेल्या कायद्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. कॉर्पोरेट घराण्यांच्या सोयीसाठी केलेले कायदे महाराष्ट्रात लागू होणार नाहीत, असे महाविकास आघाडी सरकारने जाहीर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात राज्यातील श्रमजीवी वर्ग व कामगारांच्या प्रश्नांचाही उल्लेख होणे गरजेचे आहे, अशी मागणी महाराष्ट्र इंटक राज्य कार्यकारिणी बैठकीत एकमुखाने करण्यात आली आहे.



महाराष्ट्र इंटक ही राज्यातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे व केंद्रीय इंटक जगातील सर्वात मोठी संघटना असूनही कामगार विषयक शासकीय समित्यांमध्ये इंटकला डावलले जात आहे, असा स्पष्ट आरोप या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी केला. कामगारांच्या या तीव्र भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून ना. बाळासाहेब थोरात यांना कळविण्यात आले आहे. त्यांनीही ही बाब गांभीर्याने घेतो व पुढे असे होणार नाही, असे आश्वासन दिले असल्याची अशी माहिती जयप्रकाश छाजेड यांनी दिली.



नुकत्याच झालेल्या माथाडी बोर्डाच्या फेररचनेत कामगार प्रतिनिधी म्हणून इंटकला डावलण्यात आले आहे, माथाडी बोर्ड बरखास्त करून फेररचना करुन इंटकला प्रतिनिधीत्व मिळावे, ही आग्रहाची मागणी आहे,असे देखील छाजेड यांनी सांगितले.


महाराष्ट्र इंटकचे राज्यस्तरीय प्रातिनिधीक संमेलन बोलावण्यात येणार असून त्याकरिता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी एच. के. पाटील, अखिल भारतीय इंटकचे अध्यक्ष डॉ.जी.संजीवा रेड्डी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष   बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,   नितीन राऊत, अमित देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, अ.भा.काँग्रेस कमिटी सचिव  आशिष दुआ यांना तसेच राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती जयप्रकाश छाजेड यांनी दिली. पत्रकार परिषदेला इंटकचे प्रदीप वाखारिया व अन्य मान्यवर उपस्थित होते.


टिप्पण्या