Free workshop: किफायतशीर, निर्यातक्षम शेती उत्पादन, विपणन व प्रक्रिया उद्योगांसाठी निःशुल्क कार्यशाळा



भारतीय अलंकार

अकोला: युवाराष्ट्र संस्थेद्वारा शेतकरी पुत्र व युवा शेतकऱ्यांसाठी रविवारी २० डिसेंबर रोजी वसंत सभागृह, श्री शिवाजी महाविद्यालय अकोट रोड अकोला येथे सकाळी ११वाजता पासून निःशुल्क उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन केले आहे. राज्यभरातून अनुभवी तज्ञ या कार्यशाळेत विविध विषयांवर,संधीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील व  शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान करण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती युवाराष्ट्रचे डॉ.निलेश पाटील यांनी दिली आहे. 



शेतकरी मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचे उत्पादन करतो पण शेतमालाच्या विपणन, प्रक्रिया व व्यापारात शेतकऱ्यांचा टक्का नगण्य असाच आहे. आज मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग अल्पभूधारक झालेला असून, शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातांना काम मिळण्याचा मार्ग कठीण झाला  आहे. शेतकरी उत्पादक समूह, शेतकरी उत्पादक कंपनी यासह, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री साखळी, किफायतशीर निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन, शेतमालाची निर्यात कशी करता येईल? यासह आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारांत मागणी असलेल्या रसायनमुक्त शेतमालाचे कमी खर्चात  उत्पादन घेता येईल असे उपलब्ध आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आदी बाबींवर राज्यभरातून अनुभवी तज्ञ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन कार्यशाळेत करतील.



खराब होत चाललेला जमिनीचा पोत कसा सुधारता येईल, मृदा व जल यांचे आरोग्य कसे राखता येईल,कीड व्यवस्थापनेसाठी जैविक उपाय, ई सह कृषिपुरक लघु प्रक्रिया उद्योग व विक्री व्यवस्था त्यासाठीच्या शासकीय योजना, उपलब्ध विविध पर्याय आदींबाबत कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन व मंथन कार्यशाळेत करण्यात येईल. 



कार्यशाळा निःशुल्क असून पुढेही विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करून शेतमाल प्रक्रिया,लघु उद्योग व शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था, शेतमालाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या मध्ये शेतकरीपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी युवाराष्ट्र कडून सामूहिक प्रयत्न करण्यात येणार  आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर राखून प्रथम येणाऱ्या निवडक शेतकऱ्यांना या पहिल्या कार्यशाळेत सहभागी होता येणार असून  निःशुल्क कार्यशाळेचा  युवा शेतकऱ्यांनी व शेतकरी पुत्रांनी लाभ घ्यावा व शेतमालाच्या विपणन, प्रक्रिया उद्योगात नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ.निलेश पाटील, विलास ताथोड, धनंजय मिश्रा, अविनाश नाकट, दिनेश लोहोकार आदींनी केले आहे.

टिप्पण्या