Election20:विदर्भ माझा पक्ष फुंकणार ग्रामपंचायत निवडणुकीत रणशिंग



भारतीय अलंकार

अकोला: आतापर्यंत विकासाच्या आलेखात विदर्भाची सातत्याने पिछेहाट झाली असून, येथील वीज,पाणी, सिंचन व बेरोजगारीचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहे. अशा प्रलंबिततेला विदर्भातून हद्दपार करण्यासाठी विदर्भ माझा पक्ष जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवार उभे करणार असल्याची माहिती विदर्भ माझा पक्षाचे सरचिटणीस मंगेश तेलंग (नागपूर) यांनी दिली.



मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या विदर्भ माझा पक्षाची रणनीती सांगितली. वेगळ्या विदर्भासाठी कोणताच राजकीय पक्ष पुढाकार घेत नाही. यामुळे सुजलाम सुफलाम असलेल्या विदर्भाची सर्व बाजूने पीछेहाट झाली आहे. या उलट मुंबई ,कोकण, पश्चिम महाराष्ट्र हे प्रदेश अधिक पुढारलेले व समृद्ध झाले आहेत,असे तेलंग यांनी सांगितले. 



वेगळ्या विदर्भासाठी पक्षाचे संस्थापक व माजी उपमुख्यमंत्री राहिलेले नासिकराव तिरपुडे यांनी काँग्रेस व उपमख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचा इतिहास आहे. हा इतिहास डोळ्यापुढे ठेवून नव्या दमाचे कार्यकर्ते अकोला ,वाशिम समवेत पश्चिम विदर्भात ग्रामपंचायत निवडणुकीत  उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.  



वेगळ्या विदर्भाची अस्मिता जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांनी विदर्भ माझा पक्षात सहभागी होऊन वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पक्षाची ताकद कमी असली तरी निर्धाराने आम्ही या निवडणुकीत निकराची झुंज देऊ असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजाबराव ताले, प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद नगरकर, नामदेव रक्षक, जिल्हा प्रवक्ता गजानन हरणे, सचिन ताले, प्रताप थारकर, विश्वास ताले आदी उपस्थित होते.

टिप्पण्या