Cycle Tour: पर्यावरण रक्षणासाठी अरविंद आगरकर यांची दक्षिण भारत सायकल यात्रा; आज अकोल्यातून कोल्हापूरकडे प्रस्थान



भारतीय अलंकार

अकोला: पर्यावरण रक्षण, व्यसनमुक्ती, जगा व जगू द्या, अहिंसा, शाकाहार व समाज आरोग्य अबाधित राखण्यासाठी सामाजिक जागृती व्हावी, या उद्देशाने सायकलपटू असलेले उद्योजक अरविंद आगरकर जैन हे कोल्हापूर कुंभोज बाहुबली ते श्रवण बेलगोळ कन्याकुमारी पर्यंत सायकलने यात्रा करणार आहेत.आज ते कोल्हापूर कडे अकोला येथून प्रस्थान करणार आहेत.




शांती विद्या ज्ञान संवर्धन समिती,सांगली द्वारा आयोजित ही सायकल यात्रा १६ डिसेंबर रोजी श्रीकुंभोज बाहुबली कोल्हापूर येथून प्रारंभ होईल. ही सायकल यात्रा श्रवणबेळगोळा,बेंगलोर, कन्याकुमारी येथे २ जानेवारी रोजी पोहोचून, येथे सायकल यात्रेचा समारोप होणार आहे.



कोल्हापूर येथील प्रस्थान सोहळ्याला तात्या भैय्याजी, कल्लाप्पा आवाडे,माजी खा. राजू शेट्टी, आ.राजेंद्र  यड्रावकर, आ.राजूबाबा आवळे, डि.सी.पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल भाेकरे, अभय बरगा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



या सोळा दिवसांमध्ये आगरकर १६५० किलो मीटरचा सायकल प्रवास करणार आहेत. कोल्हापूर, मिरज,  औरंगाबाद, पुणे, अकोला, जिंतूर येथील सायकलपटू यात सहप्रवासी असतील. जैन धर्मीयांचे सर्वोच्च गुरू आचार्य श्री विद्यासागर महाराज यांनी सायकल यात्रेस आशीर्वाद दिले असून, शुभेच्छा संदेश पाठविला आहे.आगरकर यात्रे दरम्यान नागरिकांना स्वस्थ पर्यावरण राखण्याचा संदेश देवून यासाठी सायकल चालविण्याचे आवाहन करणार आहेत.



आगरकर यांनी यापूर्वी अकोला ते नागपूर, जबलपूर, मध्यप्रदेश, वाराणसी, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड मधील जैन तीर्थराज श्री सम्मेद शिखरजी सायकलने गाठले. अवघ्या १७ दिवसात श्रीसम्मेद शिखरजी सर करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. या सायकल विक्रमाबद्दल इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. पर्यावरण मध्ये त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट मिळून अनेक पुरस्कार व सन्मानपत्र मिळाले आहेत.



५३ वर्षीय आगरकर या सायकल यात्रेतही कोल्हापुर, कुंभोज बाहुबली, बेळगाव, वरुर, शकारीपुर, हुम्मस, पद्मावती, मूळबिद्री, सकलेशपुर, श्रावण बेळगोळ, बंगलोर, धर्मपुरी, नामक्कल, मदुराई व कन्याकुमारी हे १६५० किलोमीटर अंतर पार करणार आहेत. आगरकर आज रविवार १३ डिसेंबरला अकोल्यातून कोल्हापूरकडे प्रस्थान करणार आहेत. अकोलेकरांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक करीत,यशाची कामना केली आहे.

टिप्पण्या