crime news: जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला

सत्तर गोवंशांना जीवनदान ; सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 



भारतीय अलंकार
बाळापूर : अवैधरित्या विनापरवाना कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्तर गोवंशांसह सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कंटेनरमध्ये चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. कंटेनर चालक पसार होण्यात यशस्वी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हि कारवाई आज रविवारी बाळापूर जवळ करण्यात आली.



आज रविवारी पहाटेच्या सुमारास एका कंटेनर मधून अकोला ते खामगावकडे गोवंशांना कोंबून कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असल्याची माहिती बाळापूर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांना खबऱ्या मार्फत मिळाली. ठाणेदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्गावरील पारस फाटा गाठत कंटेनरचा शोध घेणे सुरू केले. मात्र कंटेनरचा शोध लागत नव्हता, त्यानंतर महामार्गावरील पेट्रोल पंप, ढाबे, हॉटेल्स याठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम राबवली. अखेर महामार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालया समोर सदर यु. पी.२१ सी एन ३०४० हा कंटेनर नादुरुस्त अवस्थेत पोलिसांना मिळून आला. 


पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली असता सत्तरहून अधिक गोवंश कोंबलेले आढळले. तर यापैकी चार जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या गोवंशाची किंमत सात लाख रुपये एवढी असून कंटेनरसह एकुण सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या गोवंशांना म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे. 



ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत बाळापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, भाष्कर तायडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल अंभोरे, विठ्ठल रायबोले, अमोल ओहेकर यांनी केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, भास्कर तायडे करीत आहेत.

टिप्पण्या