Child Welfare: बालकल्याण समिती अकोलाची सतर्कता अन् अमली पाशातून बालकाची मुक्तता



ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: पोलीस स्टेशन समोरच अमली पदार्थांची विक्री होत असून, बालक याचे सेवन करतात. परंतू, याबाबतीत पोलीस अनभिज्ञ होते. मात्र, बालकल्याण समितीच्या सतर्कतामुळे ही बाब उघडकीस आली आहे. समितीने अमली पदार्थ पाशातून एका बालकाची मुक्तता केली.



अमली पदार्थ सेवन करणाऱ्या एका बालकाला मुस्कान मोहिमे अंतर्गत "बाल कल्याण समिती" समोर सादर करण्यात आले. यावेळी समिती सदस्या ॲड. मनीषा धुत आणि प्रमिला माहोरे यांनी तत्काळ समिती अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी, समिती सदस्या प्रीती वाघमारे (पळसपगार),ॲड. सुनिता कपिले यांच्याशी संपर्क साधून तत्परतेने पावले उचलली. समिती सदस्या,  प्रीती वाघमारे (पळसपगार) यांनी सादर केलेल्या मुलाचे समुपदेशन करून नशा करण्यासाठी हे अमली पदार्थ कसे उपलब्ध होतात, याची माहिती मिळविली.



पुढील सूत्र हलविण्यासाठी अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ रेल्वे चाईल्ड लाईन्स टीम बोलावण्यात आली. स्टिंग ऑपरेशन करून अकोट फाईल "पोलिस स्टेशन" ला माहिती देण्यात आली. 



यावेळी विक्रेत्याला पोलिसांनी ठाण्यात बोलवून समज दिली. हे अमली पदार्थ मुळात एक सोल्युशन्स असून, त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात नशा करण्यासाठी बालकांकडून केला जातो. आणि विशेष म्हणजे याची विक्रीही या पोलिस स्टेशन समोरच्या हार्डवेअर  दुकानातून होते. ही बाब लक्षात आणून देताच. ठाणेदार कदम यांनी तत्काळ परिसरातील सर्व हार्डवेअर दुकानदारांची सभा घेऊन त्यांना हे सोल्युशन १८ वर्षाआतील मुलांना न विकण्या बाबत समज देऊन अवगत करण्याचे ठरवले आहे.



बालकल्याण समिती लवकरच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पत्र लिहून असे सोल्युशन मुलांना विक्री बाबत निर्बंध घालण्यासाठी कळविणार आहे.

टिप्पण्या