Ram Jadhav: मराठी नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला-उध्दव ठाकरे; मुख्यमंत्री यांच्यासह राम जाधव यांना वाहिली मान्यवरांनी श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ रंगकर्मी राममामा जाधव यांना श्रद्धांजली




भारतीय अलंकार

मुंबई :  मराठी नाट्य सृष्टीच्या वाढीसाठी, चांगल्या बदलांसाठी ध्यास घेतलेला मार्गदर्शक हरपला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी राममामा जाधव यांना अर्पण केली आहे. 


मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ रंगकर्मी, रत्नागिरीच्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष राममामा जाधव यांनी आपले संपूर्ण जीवनच रंगभुमिला समर्पित केले होते. कला क्षेत्रात विविध स्तरावर काम करताना त्यांनी नाट्य चळवळ सामान्य माणसांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले. नाट्य सृष्टीचा विकास व्हावा, तिच्यामध्ये चांगले बदल घडावेत यासाठी प्रयोग देखील केले. अकोल्यातील नाट्य चळवळ, तिचा विकास हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. विदर्भातील नाट्यसृष्टीला उभारी देण्यात देखील ते पुढे होते. त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्यसृष्टीच्या बदलासाठी ध्यास घेतलेला ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी राममामा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.




राम जाधव यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीची हानी


पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचा शोकसंदेश



अकोला येथील ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे. विदर्भाच्या नाट्यक्षेत्राचे ते भूषण होते, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी रंगकर्मी राम जाधव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.



आपल्या शोकसंदेशात ना. बच्चू कडू म्हणतात, येथील ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचे आज सकाळी दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी  नाट्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे. विदर्भाच्या नाट्यक्षेत्राचे भूषण असलेल्या राम जाधव यांनी अ. भा . मराठी नाट्य परिषदेने रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या 91 व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मराठी रंगभुमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले होते. त्यांनी अकोल्याला मिळवून दिलेला सन्मान अकोलेकर कधीही विसरू शकणार नाहीत. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


नाट्य क्षेत्राची अपरिमित हानी


ज्येष्ठ नाट्य कलावंत व जेष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचे आज निधन सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्य व साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यासह राज्यातील नाट्य क्षेत्र पोरके झाले आहे.अकोल्यात अनेक मोठे नाट्य प्रकल्प राबविण्याचा त्यांचा संकल्प दुर्दैवाने अधुरा राहिलाय.नाट्य क्षेत्राची अपरिमित हानी झालीय.


                                राजेंद्र पातोडे

                                  प्रदेश प्रवक्ता

                      वंचित बहूजन आघाडी




नाट्यक्षेत्रातील वटवृक्ष कोसळला.


मामा म्हणजे नाट्यक्षेत्रातील चालत बोलत विद्यापीठ होतं. नाटका प्रति त्यांची श्रद्धा अपार होती. नाटकाशी संबंधित असलेले अनेक पदे मामांनी आपल्या कर्तुत्वाने मिळवले. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. अक्षरशहा वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत ते सतत रंगमंचावर कार्यरत होते आणि याही वयात संक्षिप्त नटसम्राट सारख्या पल्लेदार वाक्य असलेल्या नाटकाचे प्रयोग करत राहिले.


आव्हानांना भिडणे हा मामाचा मूळ स्वभाव. बुलढाणा जिल्ह्यातले मामा खामगावला पिटी टीचर होते. त्याकाळी म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी  आंतरजातीय विवाह करून मामींना घेऊन अकोल्यात आले. त्यावेळेस उसळलेल्या जनक्षोभाचा त्यांनी सामना केला. ह्या गोष्टी ते अधून मधून सांगत. त्यानंतर त्यांचा आणि मामी चा संसार फुलत गेला. याला समांतर समवयस्क मित्रांबरोबर त्यांनी रसिकाश्रय या संस्थेची स्थापना केली. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यावेळेस त्यांनी बसवलेल्या अनेक नाटकांनी मुंबई पुणे येथे धडक द्यायला सुरुवात केली. त्यांनी बसवलेल्या नाटकांमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नाट्य रसिकांचे लक्ष या नाट्य वेड्या तरुणाकडे आकृष्ट झाले. विदर्भामध्ये हौशी रंगभूमी करिता स्वतःला झोकून मामा कार्यरत राहिले. दर वर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेत मामांच्या नाटकाला काही ना काही बक्षीस मिळत गेले. आणि मग अंतिम नाटकात मिळालेली बक्षीस त्यांच्या दिवाणखान्याची शान वाढवू लागले. अमोल पालेकर जब्बार पटेल सारख्या मातब्बर लोकांसमोर मामांचं नाटक लीलया नंबर मध्ये येत असे.


याच काळात त्यांना व्यावसायिक नाटकासाठी सुद्धा विचारणा करण्यात आली पण हौशी रंगभूमीवर निरतिशय प्रेम असलेल्या मामांनी कुठेही जाण्यास नकार दिला आणि हौशी रंगभूमीला समृद्ध करण्याचं आपलं काम अतिशय श्रद्धेने करत राहिले.


त्यांना मिळालेली पारितोषिके आणि त्यांनी भूषविलेलेली पद याची यादी फार मोठी आहे. नाट्यक्षेत्रातील सगळी सर्वोच्च पदे मामांनी आपल्या स्वकर्तुत्वाने मिळवली आणि मग राम जाधव यांचा अकोला ही अकोल्याला नवीन ओळख मिळाली.


मामांना मिळालेली पारितोषिके आणि त्यांना मिळालेली पदे याची जर आपण यादी बघितली तर मामा किती उंचीचे होते हे पाहून आपण स्तिमित होतो.


रेल्वेची नोकरी सांभाळून त्यांनी संसार केला. तीन मुलं झाले योग्य संस्कार व शिक्षण यांच्या माध्यमातून तीन्ही मुले(दोन मुले व एक मुलगी) आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत.


आयुष्याच्या मध्यावर त्यांच्यावर एक आघात झाला. शेवटपर्यंत साथ देण्याच्या आणाभाका घेतलेल्या मामींनी अर्ध्यावरच साथ सोडली. या धक्क्यातून सावरायला मामांना बराच काळ लागला.


एक खंत मात्र मनात आजही राहील मामांना मी शेवटपर्यंत आग्रह करत होतो की तुम्ही आत्मचरित्र लिहा म्हणजे पुढच्या पिढीसाठी हा एक अनमोल खजिना राहिल. पण नाट्यक्षेत्रात सर्व पादाक्रांत करणाऱ्या मामांच्या हातून हीच गोष्ट राहून गेली.


त्यांनी घालून दिलेल्या प्रमाणावर पुढील पिढी कार्यरत राहील. हौशी रंगभूमीची भरभराट होईल हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. मामा सदैव अकोल्याच्या नाट्य क्षेत्राच्या आसपासच असणार आहे त्यांचे आशीर्वाद सदैव उदयोन्मुख कलावंत बरोबर असणार आहे कारण आयुष्यात नाटक आणि हौशी रंगभूमी एवढीच त्यांची प्राथमिकता होती.


मामांच्या जाण्याने जाधव कुटुंबांवर परमेश्वराने फार मोठा आघात केला आहे. हे दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो.

ईश्वर मामांच्या मृतात्म्यास सद्गती देवो.

                     


                              दिलीप देशपांडे

                                  जेष्ठ रंगकर्मी





टिप्पण्या