GST: महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने केली प्रथमच अटकेची कारवाई; आरोपी तिब्रेवाल याला ५ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी


First arrest by Maharashtra Goods and Services Tax Department;  Accused Tibrewal remanded in judicial custody till December 5




भारतीय अलंकार

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागा मार्फत प्रथमच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी दिलीपकुमार  तिब्रेवाल याला आज सकाळी अटक करून,न्यायालया समोर हजर केले असता,न्यायालयाने त्याला ५ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. 



राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-ब, वस्तू व सेवाकर विभाग, माझगांव, मुंबई या कार्यालया मार्फत केलेल्या तपासानुसार दिलीपकुमार रामगोपाल तिब्रेवाल याने स्वत:च्या कुटुंबियांच्या नावे एकूण 4 कंपन्यांची महाराष्ट्र तथा केंद्रीय वस्तू व सेवाकर कायदा 2017 कायद्याखाली नोंदणी केली असून, इतर 26 कंपन्यांची विविध लोकांच्या नावे महाराष्ट्र /केंद्रीय वस्तू व सेवाकर कायद्याखाली नोंदणी करुन घेतली आहे. 



या 30 कंपन्यांच्या आस्थापनांच्या नावे   दिलीपकुमार रामगोपाल तिब्रेवाल याने 2100 कोटी रुपयांच्याहून अधिक रकमेची बोगस विक्री बिले, कोणत्याही वस्तू वा सेवा यांचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष पुरवठा न करता निर्गमित केली आहेत. व त्या माध्यमातून 185 कोटी रुपयांचा बोगस Input Tax Credit इतर अनेक कंपन्यांना उपलब्ध करुन दिला असून त्याद्वारे शासनाच्या महसुलाचे तितक्या रकमेचे नुकसान केले आहे.असे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्याच्या कलम 132 (1)(b) व (c) अंतर्गत गुन्हा असून कलम 132 (1)(i) नुसार शिक्षेस पात्र असून कलम 132 (5) नुसार हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र स्वरुपाचा आहे.


 


दिलीपकुमार रामगोपाल तिब्रेवाल याचा संचालक M/s Augst Overseas Private Limited, तसेच संचालक M/s Aaryanaman Global Pvt.Ltd,व Proprietor M/s Shagun Fibres, आणि इतर 27 GSTIN नोंदणीकृत कंपन्यांचे प्रवर्तक (Operator) या नात्याने 23 नोव्हेंबर रोजी त्याच्या मालाड (प), मुंबई येथील निवासस्थानामधून सकाळी 7.30 वाजता पंच व पोलीसांच्या उपस्थितीत राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-ब, मुंबई यांच्या कार्यालयाकडून अटक करण्यात आली. ही कार्यवाही महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्याच्या कलम 69 नुसार करण्यात आली आहे. 



तिब्रेवाल याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी Esplanade, मुंबई यांच्या न्यायालयाकडून 5 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कार्यवाही राज्यकर आयुक्त संजीव कुमार, सह आयुक्त (अन्वेषण) संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सत्यजीत भांड, एस.पी. सरावणे व सहायक राज्यकर आयुक्त आशिष कापडणे यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पण्या