Election2020: निवडणुका अश्याही लढविल्या जावू शकतात; भाऊ श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात बहीण संगीता शिंदे यांनी दाखल केली तक्रार

        राजकारण: गल्ली ते दिल्ली

     ✍️ॲड. नीलिमा शिंगणे-जगड



भाऊबीज ओवाळणी नंतर बहीण-भावात वितुष्ट!




अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक होऊ घातली असून सर्वच उमेदवारांनी निवडणुकीत प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच गुरुवारी अमरावती येथे मंत्री उदय सामंत यांचा दौरा असताना विना परवानगी  शिक्षकांची सभा घेणे श्रीकांत देशपांडे यांना चांगलेच भोवत आहे. या प्रकरणी याच मतदार संघाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार संगीता शिंदे यांनी या प्रकारची तक्रार निवडणूक आयोग (निवडणूक आयुक्त) कडे केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत आचारसंहिता भरारी पथक प्रमुख रणजित भोसले यांच्या फिर्यादी वरून आमदार श्रीकांत देशपांडे  यांच्या विरुद्ध अमरावती मधील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु देशपांडे आणि शिंदे हे शेजारी असून, त्यांच्यात बहीण भावाचे नाते आहे. एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभे असले तरी या भाऊबीजेला शिंदे यांनी देशपांडे यांना ओवाळले होते. ओवाळणी म्हणून देशपांडे यांनी शिंदे यांना विजया साठी आशीर्वादही दिला. आता मात्र, या तक्रारी नंतर अमरावती शिक्षक मतदार संघात राजकीय घडामोडी काय वळण घेते, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.


एकीकडे कोरोनाचे कारण समोर करीत सर्व उमेदवारांना प्रशासन सभा घेण्याच्या परवानगी नाकारत आहे. अश्यातच मात्र विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना  मात्र सूट दिली जात असल्याचा आरोप संगीता शिंदे यांनी यावेळी केला. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत श्रीकांत देशपांडे यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही अशी भूमिका संगीता शिंदे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घेतल्यावर शुक्रवारी दुपारी एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे विभागिय आयुक्त यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश भरारी पथकाला दिले होते.  त्यानुसार भरारी पथक प्रमुख रणजित भोसले यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली . याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी श्रीकांत देशपांडे यांच्या  विरुद्ध  भादंवि कलम 188, 269, 270, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 , आपत्ती व्यवस्थापन कायदा 51(ब) , साथीचे रोग कलम 2,3,4 अन्वये गुन्हे दाखल केले.



यंदाची भाऊबीज




यंदाच्या भाऊबीज सणाला एकमेकांच्या प्रगतीसाठी शुभकामना करणाऱ्या  शिंदे आणि देशपांडे या बहीण भावात आता या प्रकरणामुळे वितुष्ट येण्याची शक्यता आहे.  शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत एकमेकांविरोधात काट्याची लढत देत असलेल्या शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिदे आणि आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यातील भाऊबहिणीचे नाते जुनेच आहे. त्यामुळे भाऊबीजेच्या पर्वावर श्रीकांत देशपांडे यांना संगीता शिदे यांनी मनोभावे ओवाळणी घालून त्यांचे आशीर्वाद घेतले होते.



यावेळी देशपांडे यांनी देखील त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला. संगीता शिंदे यांच्या निवासस्थानाच्या थोड्या अंतरावरच देशपांडे यांचे देखील निवासस्थान आहे. त्यामुळे पहाटेच श्रीकांत देशपांडे यांनी संगीता शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या निवासस्थानी भेट दिली तसेच कुटूंबियांची विचारपूस केली. 

यावेळी एकमेकांना विजयी शुभेच्छा देखील शिंदे आणि देशपांडे यांनी दिल्या. यावेळी आपले भाऊ या नात्याने संगीता शिंदे यांनी श्रीकांत देशपांडे यांना भाऊबीजेची ओवाळणी घातली तसेच त्यांचे आशीर्वाद देखील घेतले. यावेळी देशपांडे यांचे तोंड गोड करून त्यांना चिरंजीवी शुभेच्छा दिल्या. श्रीकांत देशपांडे यांनी देखील 'संगीता तू विजयी होवो' असे आशीर्वाद संगीता शिंदे यांना दिले होते.




आता या तक्रारी नंतर शेजार धर्म आणि बहीण भावाच्या नात्यात राजकारण आडवे येईल का, याची चर्चा शिक्षक मतदार संघात होत आहे. पण राजकारणात सर्व काही क्षम्य असते, असे म्हंटल्या जाते.  



टिप्पण्या