Eknathkhadse: एकनाथ खडसेंच्या कारला अपघात; सुदैवाने बचावले, चाहत्यांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता

भाजपातून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारला धरणगाव जवळ अपघात झाल्याची घटना आज घडली. 


अमळनेरवरून जळगावकडे येत असताना धरणगाव जवळ गाडीचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं यात एकनाथ खडसे यांच्यासह सोबत असलेले सर्वजण सुखरूप आहेत. कुणालाही दुखापत सुध्दा झालेली नाही. 



या अपघाताची माहिती एकनाथ खडसे यांनी स्वतः सायंकाळी ट्विट करून दिली. खडसे हे आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सोबत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथून  हेलिकॉप्टरने अमळनेर येथे पोहचले होते. 



अमळनेर येथे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांच्या घरी भेट दिली. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे एका शासकीय कार्यक्रमासाठी निघाले तर खडसे हे जळगावला आपल्या वाहनाने निघाले होते. दरम्यान, धरणगाव जवळ हा अपघात झाला, सुदैवाने सर्व सुखरूप आहेत.


खडसे यांनी अपघात झाल्याची माहिती आपल्या ट्विटर हॅन्डलहून ट्विट करून दिली.


"आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने आणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप  आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.",असे खडसे यांनी ट्विट केले.


सावध राहा नाथाभाऊ...चाहत्यांचा प्रेमळ सल्ला

खानदेश मधून आपण एकमेव मोठे नेते आहात जे खान्देशला देशात मोठे स्थान देवू शकतात. काळजी घ्या खडसे साहेब. आणि भाजपच्या पाळीव प्राण्यांपासून स्वतःला सावध ठेवा,असा सल्ला एका चाहत्याने खडसे यांना दिला.



तर एका चाहत्याने घातपात तर नाही ना सावध राहा नाथाभाऊ... आपल्या समोर मूंडे साहेबांचे उदाहरण आहे जनतेच्या मनात आजही शंका आहे त्या घटने बद्दल. काळजी घ्या,असे रिट्विट केले आहे.




खडसे यांचे समर्थक,चाहते,कार्यकर्ते यांनी समाज माध्यमातून चिंता व्यक्त करीत साहेब आपण काळजी घ्या,असे सांगितले.







टिप्पण्या